`आमच्याकडून चूक झाली, माफी मागतो`,रामदास आठवलेंच्या नाराजीची अखेर भाजपकडून दखल
BJP Apology to Ramdas Athawale: निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकत्री मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते.
BJP Apology from Ramdas Athawale: अनेक दिवसांपासून चर्चेत असेल्या महायुतीच्या मंत्रिमंडळाचा विस्तार अखेर पार पडला. महायुतीच्या एकूण 39 मंत्र्यांनी शपथ घेतली. यानंतर ज्यांना मंत्रिपद मिळाले नाही, त्यांची नाराजी समोर आली. सर्वच पक्षातून असे नाराज पुढे आले. दरम्यान रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनीदेखील आपण नाराज असल्याचे उघडपणे बोलून दाखवले. देवेंद्र फडणवीस यांच्या आम्ही 7-8 भेटी घेतल्या. आम्हाला मंत्रिपद मिळेल, याबाबत त्यांनी वेळोवेळी आश्वासन दिले. पण प्रत्यक्षात मात्र असे झाले नसल्याची खंत त्यांनी बोलून दाखवली होती. आपल्याला मंत्रिमंडळ शपथविधीला देखील आमंत्रित न केल्याचे त्यांनी बोलून दाखवले होते. यावर आता भाजपकडून प्रतिक्रिया आली आहे.
निवडणूक प्रचारात मला सगळीकडे घेऊन गेले मात्र शपथविधीवेळी मला आमंत्रण दिले नाही. माझ्या पक्षाने महायुतीला सहकार्य केले. पण आम्हाला एकही मंत्रिपद दिले नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावर आता भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.मंत्रिमंडळात कोणाला घ्यायचे कोणाला नाही हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय आहे. छगन भुजबळ यांना भविष्यात राष्ट्रवादी कॅाग्रेस आणि महायुती चांगले स्थान देईल. सुधीर मुनगंटीवार आणि इतरांची मंत्रीपदावरुन कोणतीही नाराजी नाही. राष्ट्रवादी आणि शिवसेना त्यांच्या पक्षातील नाराजांची नक्कीच समजुत काढतील, असे बावनकुळे म्हणाले.
मी रामदास आठवले यांची माफी मागतो. त्यांना गडबडीत मंत्रिमंडळ विस्ताराचे निमंत्रण वेळेत पोहचले नाही. आमच्याकडुन चूक झाली असल्याचे बावनकुळे यावेळी म्हणाले. घराणेशाहीचा आरोप योग्य नाही. ज्यांना मंत्री मंडळात स्थान मिळाले आहे हे त्यांच्या कर्तृत्वाने मिळाले आहे. घराणेशाहीमुळे मिळालेले नसल्याचे ते म्हणाले.
'फडणवीसांकडून दरवेळेस आश्वासन, आता कार्यकर्त्यांना काय तोंड दाखवू?'
निवडणुका येतात तेव्हा मला सगळीकडे घेऊन जातात. पण मी महायुतीचा एक भाग असून मला याचे निमंत्रण देखील नसल्याचे आठवले म्हणाले होते. विधानसभेच्या निवडणुकीत बुद्धीष्ट, आंबेडकरी समाज महायुतीसोबत होता. लोकसभा, विधानसभेला आम्हाला एकही जागा दिली न्हवती. देवेंद्र फडणवीसांसोबत आमची 8-10 वेळा चर्चा झाली होती. आमची चर्चा झाली. त्यांनी आम्हाला मंत्रिपद देण्याचे आश्वासन दिले होते. अडीच वर्षाच्या सरकारमध्येही आरपीआयला एकही मंत्रिपद नव्हते. गावागावात आमचा रिपब्लिकन पार्टीचा समाज आहे. आता त्यांना मी कसं तोंड दाखवू हा प्रश्न मला पडलाय, असे दु:ख आठवलेंनी व्यक्त केले. पंतप्रधान मोदींनी मला केंद्रात मंत्रिपद दिलय. पण ज्या कार्यकर्त्यांनी मला इथपर्यंत पोहोचवलं त्यांनाही सत्तेत वाटा मिळाला पाहिजे. आम्ही फडणवीसांची भेट घेतली. यावेळी आरपीआयला संधी मिळेल, असे ते सारखे म्हणायचे. पण आजपर्यंत आम्हाला मंत्रिपदासाठी कोणताही फोन आला नाही. त्यामुळे मीदेखील नाराज आहे. कार्यकर्तेदेखील नाराज आहे, असे आठवले म्हणाले. रिपब्लिकन पार्टी मोठा समूह आहे. अशा पार्टीकडे दुर्लक्ष करायला नको होते. 2 मंत्रिपद राहिले आहेत. तिथे रिपाईला संधी मिळावी. पुढे महापालिका निवडणुका आहेत.तिथे आमचा विचार केला जावा, असे रामदास आठवले म्हणाले.