जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर  : नागपुरात भाजप आणि काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या तुफान हाणामारीत ८ जण जखमी झाले आहेत... घरासमोर फटाके वाजवण्याच्या शुल्लक कारणावरून सुरु झालेला वाद एकमेकांवर जीवघेणे हल्ले करण्याइतपत पोहोचला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोलिसांनी या प्रकरणात भाजप नेते ओमप्रकाश उर्फ मुन्ना यादव विरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. तर मंगल यादव यांच्या नेतृत्वातल्या काँग्रेस गटाविरोधात हाणामारी आणि दंगल केल्याचा गुन्हा नोंदविला आहे.


नागपुरात शनिवारी रात्री पुन्हा एकदा यादवी संघर्ष पाहायला मिळाला. नागपूरकरांना सवयीचा झालेल्या या यादवी संघर्षाला यंदा दिवाळीच्या फटाक्यांची किनार होती... काँग्रेसचे स्थानिक नेते मंगल यादव यांच्या अजनी परिसरातील घरात शनिवारी भाऊबीज साजरी केली जात असताना मंगल यादव यांचे कट्टर वैरी आणि भाजप नेते व राज्य कामगार कल्याण महामंडळाचे अध्यक्षओमप्रकाश यादव यांच्या गटातील मुलांनी मंगल यादव यांच्या घरासमोर जोराजोरात फटाके वाजविले.


मंगल यांच्या कुटुंबीयांनी त्यांना हटकले असता वादाला सुरुवात झाली आणि थोड्याच वेळात मुलांच्या भांडणात मोठे ही सहभागी झाले... लाठ्या काठ्या, लोखंडी रॉड्स आणि तलवारी ने एकमेकांवर हल्ले चढविले गेले. त्यामध्ये भाजप नेते ओमप्रकाश यादव यांनी तलवारीने मंगल यादव आणि अवधेश यादव यांच्यावर जीवघेणे हल्ले केल्याचा आरोप मंगल यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे.
   
भाजप नेते ओमप्रकाश यादव यांच्या गटाने हे सर्व आरोप फेटाळले आहे. घटना घडली तेव्हा मुन्ना यादव तिथे नव्हते असा दावा भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, स्वतः ओमप्रकाश यादव कैमेऱ्या समोर येऊन काहीच सांगत नाही..


पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य पाहता परिसरात बंदोबस्त वाढविला आहे. मंगल यादव यांच्या तक्रारींवर भाजप नेते ओमप्रकाश यादव, त्यांची पत्नी आणि विद्यमान नगरसेविका लक्ष्मी यादव, बाला यादव आणि इतर दोघांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदविला आहे. तर ओमप्रकाश यादव गटाच्या तक्रारीवर मंगल यादव आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर मारहाण आणि दंगलीचा गुन्हा नोंदविला आहे.