भुसावळमध्ये नगरसेवकाची राजकीय हत्या की टोळीयुद्धाचा बळी?
हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या खरात कुटुंबीयांना घटनेची आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले
विकास भदाणे, झी २४ तास, जळगाव : गेल्या काही दिवसांपासून शांत असलेल्या भुसावळ शहरात संघटीत गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. भाजपा नगरसेवक रविंद्र खरात यांच्यावर टोळीयुद्धातून गोळीबार झाला. यात रवींद्र यांच्यासह त्यांचे बंधू सुनील, मुलं प्रेमसागर, रोहित उर्फ सोनू आणि सुमित गजरे यांचा बळी गेला. एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना भुसावळमध्ये नगरसेवकाच्या हत्येमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. ही राजकीय हत्या आहे की टोळीयुद्धाचा बळी? असा प्रश्न निर्माण होतोय.
हल्ल्याचे साक्षीदार असलेल्या खरात कुटुंबीयांना घटनेची आपबीती सांगताना अश्रू अनावर झाले. यामागे बड्या राजकीय लोकांचा हात असण्याची शक्यता त्यांनी वर्तवली असून आपल्याला न्याय मिळावा, अशी मागणी केलीय.
खरात कुटुंबीयांचं सांत्वन करण्यासाठी केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले, राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन, आमदार संजय सावकारे सोमवारी संध्याकाळी भुसावळमध्ये आले होते. या प्रकरणाची सीआयडी चौकशी झाली पाहिजे, असे मत आठवलेंनी व्यक्त केलं.
भुसावळमध्ये गोळीबार, हल्ले, खून अशा घटनांचा आलेख कमी होत नसल्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. त्यातच निवडणूक जवळ आल्यामुळे शहरातल्या कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न अधिक बिकट बनलाय.