नागपूर : महापालिका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याच्या विरोधात महापालिका तांत्रिक विभाग कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन सुरू केले आहे. भाजप नगरसेविका रूपाली ठाकूर यांच्या दिराने महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्यानंतर कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नगरसेविकेचा दिर विक्की ठाकूर विरुद्ध  हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विक्की ठाकूरवर कडक कारवाईची मागणी करीत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन करत आहेत. 


नागपूर महापालिकेतील सत्ताधारी भाजप नगरसेविकेच्या नातेवाईकाने महापालिका कर्मचाऱ्यास मारहाण केल्याच्या निषेध करीत नागपूर महापालिका तांत्रिक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी आज कामबंद आंदोलन केले. जोपर्यंत मारहाण करणाऱ्या आरोपींना अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु ठेवण्याचा इशारा आंदोलक कर्मचाऱ्यांनी दिला.


नीलेश हाथीबेड असे मारहाण करण्यात आलेल्या महापालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे. गणेश विसर्जनासाठी तयार करण्यात आलेल्या कृत्रिम टाक्या उचलण्याचे काम सुरु असताना सोमवारी रात्री अकराच्या सुमारास नीलेश हा गाडीसह नागपूरच्या शारदा चौकात माती हटवण्याच्या कामासाठी थांबला होता. त्यावेळी स्थानिक भाजप नगरसेविका रुपाली ठाकूर यांचा  दिर विक्की ठाकूर तिथे सहकाऱ्यांसह आला व गाडी हटवण्यास सांगितले. यावरून नीलेश व विक्की ठाकूर यांच्यात वाद झाला ज्यानंतर विक्की ठाकूरने त्याच्या ४ -५ सहकाऱ्यांच्या मदतीने नीलेश याला जबर मारहाण केली. जखमी नीलेशला इतर कर्मचाऱ्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले असून तिथे त्याचावर उपचार सुरु आहेत. 


नीलेशच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा विक्की ठाकूर विरुद्ध दाखल केला आहे. ज्यानंतर जबर मारहाण करणाऱ्या गुन्हेगारांवर कडक कारवाईची मागणी करीत महापलिका तांत्रिक विभाग कर्मचारी व वाहनचालकांनी आज कामबंद आंदोलन केले. ज्यामुळे महापालिकेची सुमारे दीडशे वाहनांची चाके आज थांबली. या कामबंद आंदोलनात अत्यावश्यक सेवेतील वाहने वगळण्यात आली होती. जोपर्यंत आरोपी विक्की ठाकूरवर कडक कारवाई करून अटक करण्यात येत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे आंदोलकांनी यावेळी सांगितले.