Chandrakant Patil : राज्यातील 7 सात हजार 751 ग्रामपंचायतींचे निकाल हाती येऊ लागले आहेत. संपूर्ण राज्यभरात ग्रामपंचायतीमध्ये संमिश्र निकाल हाती आले आहेत. काही ग्रामपंचायतीमध्ये (Gram Panchayat Election Result 2022) भाजपने बाजी मारली आहे तर कुठे सत्ताधाऱ्यांना धक्का बसला आहे. राष्ट्रवादी, ठाकरे गटानेही चांगले यश मिळवले आहे. जनतेतूनच थेट सरपंच (sarpanch) निवडून देण्याच्या नव्या नियमांनुसार रविवारी मतदान पार पडले होते. त्यानंतर आता निकाल हाती आले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ग्रामपंचायत निवडणुकीत अनेक प्रस्थापितांना धक्का बसला आहे. राज्याचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनीही या निवडणुकीत प्रचाराची धुरा हाती घेतली होती. मात्र चंद्रकांत पाटील यांनी प्रचार केलेल्या उमेदवाराचा पराभव झाला आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या चंद्रकांत पाटील यांनी मावळ तालुक्यातील निगडे आणि भोयरे ग्रामपंचायतीमध्ये प्रचार केला होता. मात्र निगडे ग्रामपंचायतीतील भाजप उमेदवाराचा पराभव झालाय. तर त्याठिकाणी राष्ट्रवादीच्या भिकाच्या मुक्ताजी भागवत यांचा विजय झाला आहे. दुसरीकडे भोयरे ग्रामपंचायतीमध्ये भाजपच्या वर्षा अमोल भोईरकर यांचा विजय झाला आहे.


पुण्याच्या मावळ तालुक्यात नऊ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक पार पडली आहे. या चुरशीच्या निवडणुकीत मंत्री चंद्रकांत पाटील, भाजपचे बाळा भेगडे, राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. नऊपैकी शिरगाव ग्रामपंचायत ही बिनविरोध झाली. नऊ पैका सहा जागांवर राष्ट्रवादीला यश मिळाले आहे तर भाजपला चार जागांवर समाधान मानावे लागले आहे. शिदें गट आणि ठाकरे गटाला मावळमध्ये खातेही उघडता आलेलं नाही.


बबनराव पाचपुते यांच्या मुलाचा पराभव तर पुतण्या विजयी


माजी मंत्री आणि भाजप आमदार बबनराव पाचपुते यांना ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये धक्का बसला आहे. पाचपुते यांच्या  काष्टी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मुलगा प्रतापसिंह पाचपुते यांचा पराभव झाला असून पुतणे साजन पाचपुते विजयी झाले आहेत. निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वीच साजन पाचपुते यांनी निवडणूक लढवणार असल्याच जाहीर केले होते. बबनराव पाचपुते यांनी देखील मुलगा प्रताप सिंह निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केल्यामुळे पुतण्या आणि मुलगा सरपंच पदासाठी आमने-सामने उभा राहिले होते. यात 191 मतांची आघाडी घेत साजन पाचपुते विजय झाले आहेत. सरपंच पदासाठी साजन पाचपुते विजय झाले असले तरी साजन पाचपुते यांच्या गटातील 17 पैकी 7 उमेदवार निवडून आले आहेत. तर प्रतापसिंह पाचपुते यांच्या गटातील 17 पैकी 10 उमेदवार निवडून आले आहेत.  निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती आणि त्यांच्याच आशीर्वादाने आपण निवडून आल्याची प्रतिक्रिया साजन पाचपुते यांनी दिली आहे.