मुंबई: औरंगाबाद महानगरपालिकेचे उपमहापौर विजय औताडे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. औरंगाबाद महानगरपालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती आहे. मात्र, राज्यातील युती संपुष्टात आल्याने आपण उपमहापौरपदाचा राजीनामा देत असल्याचे औताडे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे आता औरंगाबादमधील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. औरंगाबाद महापालिका निवडणुकीस अवघे पाच महिने शिल्लक आहेत. युती तुटल्यामुळे भाजपा व शिवसेना राज्यातील सर्वच महापालिका निवडणुका स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट आहे. भाजपा-शिवसेना युतीची औरंगाबाद महापालिकेवर साधारण ३० वर्षे सत्ता राहिली आहे.


यानंतर लगेचच शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली. औरंगाबाद महानगरपालिकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, हा ठराव भाजपच्या पचनी पडला नाही. त्यामुळे विजय औताडे यांनी उपमहापौरपदाचा राजीनामा दिल्याचे शिवसेनेने म्हटले आहे.