Devendra Fadnavis Big Revelation: पोलीस आयुक्त संजय पांडेंना मला अटक करण्याचं टार्गेट देण्यात आलं होतं असा गौप्यस्फोट राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते असा गंभीर आरोप फडणवीसांनी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात बोलताना केला आहे. उद्धव ठाकरेंनीच माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे बंद केला असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान आपण त्यांचे कट्टर राजकीय विरोधक असून ताकदीने विरोध करणार असं स्पष्ट करताना त्यांनी वैयक्तिक वैर नसल्याचं स्पष्ट केलं. 


फडणवीस नेमकं काय म्हणाले?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"आजही माझं उद्धव ठाकरेंशी वैर नाही. पण माझ्यासाठी मातोश्रीचे दरवाजे त्यांनीच बंद केले. माझा फोनही त्यांनी घेतला नाही. पाच वर्षं आपण ज्यांच्यासह काम करतो, ज्यांच्यासह सरकार चालवतो त्यांचा किमान फोन तरी उचलला पाहिजे आणि तुमच्यासोबत यायचं नाही असं सांगितलं पाहिजे. पण त्यांनी मातोश्रीचे दरवाजे बंद केले याचं दु:ख आहे," असं फडणवीसांनी सांगितलं. 


"मी राजकीय वैर ठेवत नाही. आमचं सरकार राजकीय वैराने वाढणारही नाही. पण या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये माझ्यावर केसेस टाकण्याच्या, फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न झाला. मला जेलमध्ये टाकण्याचं टार्गेट पोलीस आयुक्त संजय पांडेंना देण्यात आलं होतं. पण मला अटक व्हावी असं मी काहीच केलं नव्हतं. यामुळे त्यांचे प्रयत्न यशस्वी होऊ शकले नाहीत," असा दावा फडणवीसांनी केला. 


"कोणत्याही परिस्थितीत मला अडकवा, जेलमध्ये टाका असे आदेश महाविकास आघाडीने दिले होते. तुम्ही पोलिसांना विचारलंत तर तेदेखील सांगतील," असंही फडणवीस म्हणाले. 


'आमच्या सरकारमध्ये आल्याने कारवाई थांबली नाही'


"संजय राठोड यांनी क्लीन चीट महाविकास आघाडी सरकारनेच दिली होती. त्या काळात ज्यांच्यावर कारवाई झाली, त्यांच्यातील काही आमच्याकडे आले हे खरं आहे. पण आमच्याकडे आल्यानंतर चौकशी बंद झाली असं एक उदाहरण दाखवा. काहींची संपत्ती जप्त झाली आहे तर काहींविरोधात चार्जशीट दाखल झाली आहे. त्यामुळे आमच्याकडे आल्यानंतर कारवाई थांबल्याचं एकही उदाहरण नाही. आमच्या नेत्यांचं व्हिजन ठरलेलं असून ते कोणत्याही कारवाईत हस्तक्षेप करत नाहीत," असं फडणवीस म्हणाले.