जालना: आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या विविध पक्षांमधून भाजपमध्ये नेत्यांची जोरदार 'आयात' सुरु आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी भाजपची तुलना वॉशिंग मशीनशी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, आमच्याकडे वॉशिंग मशीन आहे. बाहेरून एखादा आमदार आला की, आम्ही त्याला या वॉशिंग मशीनमध्ये टाकतो. त्याला स्वच्छ धुतो आणि मग आमच्या लाईनीत उभं करतो. या वॉशिंग मशीनमध्ये गुजरातची निरमा पावडर वापरली जाते. त्यामुळेच तो माणूस स्वच्छ होतो आणि आपल्यात येतो, असे रावसाहेब दानवे यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ते बुधवारी जालन्यात महाजनादेश यात्रेदरम्यान आयोजित करण्यात आलेल्या सभेत बोलत होते. यावेळी दानवे यांनी आपल्या नेहमीच्या शैलीत तुफान फटकेबाजी केली. दानवे यांनी काँग्रेसला लागलेल्या गळतीवर उपरोधिक भाष्य केले. त्यांनी म्हटले की, काँग्रेसने फक्त गरिबी हटावची घोषणा दिली. प्रत्यक्षात मात्र काहीच केले नाही. त्यामुळेच गरिबांनी काँग्रेसला हटवले. 


'भ्रष्टाचाराचे आरोप असणारे भाजपात, कोणत्या वॉशिंग पावडरने स्वच्छ करता'


आता काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारायला कोणीही तयार नाही. काँग्रेसचे नेते आरोप करतात की, तुमच्या मुख्यमंत्र्यांनी आमचे आमदार फोडले. मात्र, तुमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनीच स्वत:च्या पदाचा राजीनामा दिला. आता तोच पळपुटेपणा करत असेल तर खालचे लोक काय करतील, असा सवाल दानवे यांनी उपस्थित केला.