औरंगाबाद : भाजपचे जेष्ठ नेते आणि विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी पक्षाला घरचा आहेर दिलाय. यापूर्वी कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे आणि सर्व बाबी तपासून केली जायची. मात्र, आता तसे होत नाही, अशी तीव्र नाराजी व्यक्त केलेय.


बागडेंची तीव्र नाराजी


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा आणि जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी औरंगाबाद शहरातील सिमंत मंगल कार्यालयात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.  


भाजपमध्ये कोणाला घेताना त्याच्या बाबी तपासल्या जायच्या. आज मात्र आपल्या पक्षात ज्याच्यावर खूनाचा गुन्हा आहे आणि जो वेडा आहे. या दोन व्यक्ती सोडल्या तर प्रत्येकाला प्रवेश दिला जातो, अशा शब्दात बागडे यांनी नाराजी व्यक्त केलीय.


पक्षही बदललाय


अटलबिहारी वाजपेयी जनसंघाचे बराच काळ म्हणजे आणीबाणीच्या काळापर्यंत अध्यक्ष होते. जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षात काम करत असतांना कार्यकर्त्यांची निवड ही काटेकोरपणे केली जायची. आज परिस्थिती वेगळी आहे, समाज बदलला आहे, त्यानुसार पक्षही बदलला. आता पक्षात कोणालाही घेतलं जाते, हे योग्य नव्हे.


टीका भाजपला अडचणीची!


राज्य व देशभरात भाजपमध्ये येणाऱ्यांची संख्या वाढली आहे. यात गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या इतर पक्षातील अनेक पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पक्षाचा विस्तार करण्याच्या नावाखाली प्रवेश दिला जातोय. यावरून सर्वच राजकीय पक्षांनी भाजपवर टीकेची झोड उठवली असतानाच हरिभाऊ बागडे यांनी केलेली टीका भाजपला अडचणीची ठरू शकते.