लातूर : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आता भाजपाकडून निवडून आलेल्या जिल्हा परिषद समितीच्या एका सदस्यानं राजीनामा दिला आहे. लातूर जिल्ह्यातील औसा पंचायत समितीचे भाजप सदस्य जनार्दन रतन कास्ते यांनी मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. लातूर जिल्ह्यातील मराठा क्रांती मोर्चाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत जाऊन त्यांनी लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे सदस्य पदाचा राजीनामा दिला. मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवरच हा राजीनामा आपण दिल्याचे त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जनार्दन कास्ते हे गेल्या पंचायत समिती निवडणुकीत भाजपकडून औसा तालुक्यातील लोदगा गणातून ते निवडून आले होते. इतरही मराठा लोकप्रतिनिधींनीही मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राजीनामा देण्याचं आवाहनही जनार्दन कास्ते यांनी केलं आहे.


याआधी शिवसेनेचे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांनी या मागणीसाठी राजीनामा दिला आहे. त्यांनी ईमेलद्वारे विधानसभा अध्यक्षांकडे राजीनामा सोपवल्याची चर्चा आहे. त्यापाठोपाठ काहीवेळातच वैजापूरचे आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांनीही राजीनामा देणार असल्याचे सांगितले. वैजापूर येथील आंदोलनादरम्यान त्यांनी ही घोषणा केली. भाऊसाहेब चिकटगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत. त्यामुळे आता उर्वरित मराठा आमदार काय भूमिका घेतात, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. या राजीनाम्यांमुळे सरकार आणि पर्यायाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरील दबाब वाढू शकतो.