भाजपा पक्ष चालवण्यात विनोद तावडे यांची मोठी भूमिका आहे. विनोद तावडे कर्तृत्ववान नेते असून, जिथे पाठवू तिथे यश कसं मिळवायचं याचा बारकाईने विचार करतात असं विधान भाजपा नेते चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. विनोद तावडे यांच्यासाठी अनेक पर्याय चर्चेत आहेत असंही ते म्हणाले आहेत. विनोद तावडे खूप मोठे झाले तर आम्हाला आनंदच होईल असंही त्यांनी सांगितलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"विनोद तावडे हे कर्तुत्वान व्यक्तिमत्व आहे. जिथे पाठवू त्याठिकाणी यश कसे मिळेल यासाठी ते सगळे बारकावे पाहतात. 1995 ला ते महाराष्ट्रात सरचिटणीस झाले. नंतर चार वर्षात ते मुंबईचे अध्यक्ष झाले आणि आताही ते ऑल इंडिया सेक्रेटरी म्हणून गेले आहेत.ते जनरल सेक्रेटरी झालेत. आज सगळा पक्षा चालवण्या मागे त्यांची मोठी भूमिका आहे," असं कौतुक चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे. 


पुढे ते म्हणाले की, "त्यामुळे केंद्र त्यांना काय द्यायचं आणि काय नाही यासंबंधी निर्णय घेईल. त्यांच्या बाबतीत अनेक पर्याय चर्चेत आहेत. ते काहीही झाले तरी मोठेच होतील आणि मला खूप आनंद होईल". आता सुद्धा त्यांना मोठी संधी दिली जाऊ शकते आणि त्यामध्ये सुद्धा ते चांगलेच काम करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 


"भाजपमध्ये खूप माणसं आहेत जो ज्या पदावर आहे त्याचा कार्यकाळ संपला की तो बदलला जातो. आमचं एक वैशिष्ट्य आहे की आमचं ज्या स्तरावर ठरतं ती गोष्ट शेजारच्या मुंगीला सुद्धा कळत नाही. राष्ट्रीय अध्यक्ष बदलावे लागणारच आहेत. पण भाजपामध्ये खूप जास्त कार्यकर्ते असल्याने एकच व्यक्ती दोन दोन जबाबदाऱ्या पार पाडत नाही. झारखंड, हरियाणा आणि महाराष्ट्र राज्याचे निवडणुका आहेत. त्यामुळे त्या होईपर्यंत जे पी नड्डा यांच्या आहे अशीच जबाबदारी सुद्धा राहू शकते असंही ते म्हणाले आहेत. 


उद्धव ठाकरेंचं कौतुक


यावेळी चंद्रकांत पाटील यांनी लोकसभा निवडणुकीतील यशाबद्दल उद्धव ठाकरेंचं कौतुक केलं. उद्धव ठाकरेंनी सर्वात जास्त मेहनत घेतली अशा शब्दांत त्यांनी स्तुतीसुमनं उधळली. "शिवसेनेला भाजपासोबत युती असताना 23 जागा लढायला मिळाल्या आणि 18 जागा जिंकल्या. आता सर्वात जास्त मेहनत उद्धव ठाकरेंनी घेतली. मित्र असल्याने मला त्यांच्या आजारपणाबद्दल भीती वाटत होती. पण ते फार फिरले आणि 9 जागा जिंकल्या. 2019 मध्ये युती कायम राहिली असती तर ज्यांना घऱी जायचं होतं त्यांना 13 आणि 8 जागा मिळाल्या," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. 


चंद्रकांत पाटील यांनी यावेळी उद्धव ठाकरेंनी आत्मपरीक्षण करण्याचा सल्लाही दिला. ते म्हणाले की, "उद्धव ठाकरेंनीही आत्मपरीक्षण करायला हवं. आपण काय मिळवलं याचा विचार करायाल हवा. अल्पसंख्यांकांच्या मतावर निवडून आलेले असा ठपका बसला. हा भगवा नव्हे तर हिरवा विजय असल्याचं मनसेच्या एका नेत्याने चांगलं विश्लेषण केलं आहे. दुसरीकडे 18 च्या 9 जागा झाल्या. 2019 ला एकत्र राहिले असते तर ही वाताहत झाली नसती. यामध्ये काँग्रे आणि राष्ट्रवादीचा बक्कळ फायदा झाला. याचं विश्लेषण त्यांनी करायला हवं".