मावळ: मावळमध्ये अखिल बैलगाडा संघटनेनं आयोजित केलेली बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उपस्थिती लावली. मावळमधील इंदोरी इथे महाहिंद केसरी घाटात ही बैलगाडा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर आणि बैलगाडा शर्यतीवरील बंदी उठवल्यानंतर आयोजित ही बैलगाडा शर्यत पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येनं गर्दी झाली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळ बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीला पुन्हा एकदा जोरदार टोला लगावला आहे. मला आनंद आहे माझा गाडा देखील याठिकाणी धावला, आणि पहिल्या नंबरला आला. तुम्ही ठरवलं तर माझा नंबर पहिला येतो. 2014ला पण आणला होता आणि 2019 ला पण आणला होता. काही लोकांनी 3 मार्कशीट जोडल्या. पण आपला नंबर पहिलाच होता असा टोला फडणवीस यांनी लगवला आहे. 


तुमच्या मनात पहिला नंबर द्यायचा होता तो तुम्ही दिला. आता बैलगाडा देखील पहिला आला. आणि मावळच्या धरतीवर ज्याचा बैलगाडा पहिला आला त्याला कोणी थांबवू शकत नाहीस असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


जे लोक बैलगाडा शर्यतीवर बंदी आणण्याचा विचार करतात त्यांनी एकदा मावळात येऊन बघावं. हा उत्साह कसा असतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर शर्यत सुरु करू शकलो. 2013 साली संरक्षित प्राणी म्हणून घोषित झालं आणि बैलगाडा शर्यतीवर बंदी आली. भाजप सरकार आल्यावर बंदी हटवली पण पुन्हा बंदी आली. प्रकाश जवडेकरांनी पुन्हा परवानगी दिली. शर्यत सुरू झाली. पुन्हा कोर्टात जाऊन बंदी आणली गेली, असं फडणवीस यांनी म्हटलं आहे.


मी स्वतः बैलगाडा शर्यतीचा कायदा विधानसभेत मांडला आणि मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयात जाऊन बंदी आणली गेली. पण यांना माहीत नाही शेतकरी बैलाला पोटच्या मुलासारखा  जपतो. बैलाचा परिवाराचा भाग असतो. मी स्वतः कमिटी तयार करून बैल धावणार प्राणी असल्याचे रिपोर्ट केले. हा रिपोर्ट सर्वोच्च न्यायालयात गेला. आणि बैल धावणारा प्राणी आहे हे मान्य करून बैलगाडा शर्यतींना मान्यता मिळाली, असं फडणवीस यांनी म्हटलंय.