जळगाव : एकनाथ खडसे शिवसेनेच्या संपर्कात नसल्याचे गिरिश महाजन यांनी स्पष्ट केले. शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी हसत हसत ते वक्तव्य केले असल्याचे त्यांनी 'झी २४ तास'ला सांगितले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि एकनाथ खडसे यांची भेट झाली पण याचा काही राजकीय अर्थ काढू नये असेही महाजन यांनी म्हटले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मला गुलाबराव कालच भेटले होते. मी त्यांना खडसे शिवसेनेत येण्याच्या त्यांच्या वक्तव्याबद्दल विचारले. त्यावेळी आपण हे गंमतीत माध्यमांशी बोलल्याचे गुलाबरावांनी सांगितल्याचे महाजन यावेळी म्हणाले. गुलाबराव पाटील आधी राज्यमंत्री होते तर आता ते कॅबिनेट मंत्री आहेत. ते आपल्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात.


पाच-सहा जण भाजपच्या संपर्कात आहेत हे खरे आहे का ? असा प्रश्न माध्यमांनी गुलाबरावांना विचारला. तेव्हा हो..हो..खडसे देखील आमच्या संपर्कात असल्याचे मी म्हणालो होतो असे गुलाबरावांनी सांगितल्याचे महाजन म्हणाले. मी गंमतीमध्ये बोललो पण मीडियाने तो विषय उचलून धरल्या असे गुलाबराव आपल्याशी बोलल्याचे देखील महाजन यांनी सांगितले.



'नाराजीबाबत चर्चा नाही'


जळगाव जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर फडणवीस, महाजन आणि खडसे यांची भेट झाली. यावेळी केवळ जळगाव निवडणुकीसंदर्भातच चर्चा झाल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली. या व्यतिरिक्त कोणतीही चर्चा झाली नसल्याचेही खडसे म्हणाले. भाजपात नाराजीबद्दल कोणतीही चर्चा झाली नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे आम्ही नावे पाठवली होती. या पार्श्वभुमीवर देवेंद्र फडणवीस आणि गिरिश महाजन आणि माझ्यात भेट झाल्याचे खडसे म्हणाले. जळगाव जिल्हा परिषदेवर गेली वीस वर्षे भाजपची सत्ता आहे. भाजपच्या सत्तेला सुरुंग लावण्यासाठी शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कंबर कसली आहे.