अमित जोशी, झी मीडिया, मुंबई : जेपींच्या आंदोलनापासून राजकारणात सक्रिय झालेले किरिट सोमय्या आता पुन्हा मैदानात उतरलेत. रेल्वे गाड्या ते पीएमसी बँकेच्या खातेदारांपर्यंत अनेक ठिकाणी आंदोलन करणारे सोमय्या मोदी सरकार पार्ट वनमध्ये खासदार होते. पण उद्धव ठाकरेंवर माफिया राजचा आरोप सोमय्यांना भोवला आणि शिवसेनेनं सोमय्यांविरोधात रान उठवलं. सेनेच्या दबावापायी भाजपला सोमय्यांचं तिकीट कापावं लागलं. नाराज नाही असं म्हणत असले त्यानंतर पाच-सहा महिने सोमय्या गायब होते पण मुळातच विरोधकाचा जोश असलेले सोमय्या आता महाविकासआघाडीविरोधात सक्रिय झालेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरे कारशेडला स्थगिती, अँक्सिस बँकेतली खाती वळवणं, पीएमसी बँक, गुडविन, सुनील राऊतांना मंत्रिपद नाकारणं, प्रकल्पांचे फेरआढावे अशा अनेक विषयांसंदर्भात किरीट सोमय्यांनी सरकारविरोधात दारुगोळा भरायला सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्यांना फारसं गांभीर्यानं घेण्याची गरज नाही, असं सत्ताधाऱ्यांना वाटतंय.



किरीट सोमय्यांचा पिंड आंदोलनाचा आणि स्वभाव बंडखोर आहे. ते प्रचंड आक्रमक आहेत. प्रश्नांचा फारच भडीमार करतात. अतिशय आक्रमक टीका करतात. मधल्या काळात ते बरेच शांत होते पण आता नव्यानं मैदानात उतरले आहेत. किरीट सोमय्यांनी मधल्या काळात थेट उद्धव ठाकरेंना अंगावर घेतलं होते. त्यावेळी सत्ता भाजपची होती. आता सरकार ठाकरेंचं आहे. त्यामुळे आगामी काळात हा सामना अधिक रंगतादार होणार आहे.