Madhav Bhandari  : काँग्रेसचे बडे नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर भाजपमध्ये नाराजीनाट्य रंगल्याचे चित्र पहायला मिळत आहे. भाजपचे वरिष्ठ नेते आणि प्रवक्ते माधव भंडारी यांना 12 वेळा उमेदवारी नाकारली आहे.  माधव भंडारींच्या मुलानं X या सोशल मीडियावर ट्विट करून आपल्या मनातली खदखद व्यक्त केली आहे.


वडिलांसाठी मुलाची पोस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जवळपास 12 वेळा माधव भंडारींचं नाव उमेदवार म्हणून चर्चेत आलं. मात्र त्यांना कधीच उमेदवारी मिळाली नाही, अशा शब्दात मुलगा चिन्मय भंडारी यांनी आपली नाराजी व्यक्त केलीय.. त्यांची ही पोस्ट सोशल मीडियात व्हायरल झालीय. आपल्या वडिलांनी पक्षासाठी कशा खस्ता खाल्ल्या, निस्वार्थीपणे मेहनत घेतली, याचं चित्र चिन्मय यांनी पोस्टमधून मांडल आहे.


अशोक चव्हाण यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी


भाजपच्या तीनही उमेदवारांनी राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. अशोक चव्हाणांनी भाजपकडून राज्यसभेचा अर्ज भरलाय. तर मेधा कुलकर्णींनीही अर्ज दाखल केलाय. डॉ. अजित गोपछडेंनीही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज भरलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अर्ज दाखल करण्यात आला. 


नारायण राणेंना  राज्यसभेत पाठवलं जाणार नाही


रायगड लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आमनेसामने आलेले असताना आता रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघावरुन भाजप-शिवसेना शिंदे गट आमनेसामने आलेत. केंद्रीय मंत्री नारायण राणेंना राज्यसभेत पाठवलं जाणार नाहीये, त्यामुळे राणेंनी लोकसभा निवडणूक लढवण्याची तयारी सुरु केलेली असतानाच शिंदे गटानं मोठा दावा केलाय. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय. विनायक राऊत या मतदारसंघातून दोन टर्म निवडून आलेत, विशेष म्हणजे दोन वेळा निलेश राणेंचा पराभव करुन राऊत निवडून आलेत. विनायक राऊत ठाकरे गटात असले तरी या मतदारसंघात शिंदे गटाची ताकद असल्याचं सांगत सामंत यांनी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघावर दावा केलाय.


महायुतीच्या उमेदवारांचे राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल


महायुतीच्या उमेदवारांनी राज्यसभेसाठीचे अर्ज दाखल केलेत. शिवसेना शिंदे गटाकडून मिलिंद देवरा यांनी अर्ज भरलाय. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि शिंदे गटाचे नेते उपस्थित होते. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून प्रफुल्ल पटेलांनी राज्यसभेसाठी अर्ज भरला. त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. तर काँग्रेसच्या चंद्रकांत हंडोरेंनीही अर्ज दाखल केलाय.  प्रफुल्ल पटेलांना पुन्हा एकदा राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यामुळे विरोधकांनी अजित पवार गटावर निशाणा साधलाय. अपात्रतेची टांगती तलवार असल्यामुळे पटेलांना पुन्हा संधी दिली अशी टीका राऊतांनी केलीय तर काही गोष्टी गुलदस्त्यातच राहू द्या, असं उत्तर अर्ज भरल्यावर प्रफुल्ल पटेलांनी दिलंय.