`वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही`
उद्धव ठाकरे सोमवारी नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. यावेळी त्यांनी कुटुंबासह प्रभू श्रीरामाची पूजा केली. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं.
सोमवारी अयोध्येत राम मंदिरात रामलल्लाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर दुसरीकडे उद्धव ठाकरे नाशिकच्या काळाराम मंदिरात पोहोचले होते. उद्धव ठाकरेंसह पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र आदित्य आणि तेजस ठाकरे उपस्थित होते. उद्धव ठाकरेंनी कुटुंबासह वैदिक मंत्रोच्चारात श्रीरामाची पूजा केली. यानंतर रामाची आरतीही करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते. दरम्यान यावेळी उद्धव ठाकरेंच्या लूकने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. याचं कारण त्यांचा लूक दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंची आठवण करुन देत होता.
उद्धव ठाकरे यांनी भगवा कुर्ता परिधान केला होता. तसंच गळ्यात रुद्राक्षाच्या माळा घातल्या होत्या आणि कपाळावर भगवा टीळा लावला होता. त्यांना पाहिल्यानंतर अनेकांना बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) आठवण आली. सोशल मीडियावर त्यांचे अनेक फोटो व्हायरल झाले.
दरम्यान यावरुन भाजपा नेते नितेश राणे यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही असा टोला त्यांनी एक्सवरुन लगावला आहे. मध्येच यूटर्न घेतला नसता तर अयोध्येत दर्शनापासून तोंड लपवायची पाळी आज आली नसती असंही ते म्हणाले आहेत.
"वडिलांसारखी केवळ वस्त्रं घालून वारसा सांगता येत नाही. वडिलांसारखे नेतृत्त्व, कर्तृत्त्व, विचारधारा जपायची असते, नव्हे तर ती आणखी पुढे न्यायची असते. मध्येच यूटर्न घेतला नसता तर अयोध्येत दर्शनापासून तोंड लपवायची पाळी आज आली नसती," असं नितेश राणे म्हणाले आहेत.
दरम्यान नितेश राणे यांनी संजय राऊतांनी नाशिकमध्ये केलेल्या भाषणावरुनही निशाणा साधला आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची तुलना रामाशी केली. रामाकडे जो संयम होता, तोच संयम उद्धव ठाकरेंकडे आहे असं ते म्हणाले आहेत. भाजपात विष्णुचा तेरावा अवतार जन्माला आला आहे. तुम्ही तुमच्या विष्णूला पुजा आम्ही आमच्या रामाला पूजतो असंही उपहासात्मकपणे ते म्हणाले. तसंच आजचा रावणही अजिंक्य नाही म्हणत अप्रत्यक्षपणे नरेंद्र मोदींवर निशाणा साधला.
यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले आहेत की, "ज्यांनी प्रभू रामचंद्रांचा अवमान करून हिंदुत्ववादी भूमिका गुंडाळून ठेवली ते आज राम कोण? आणि रावण कोण? हे सांगत आहेत. संजय राऊत यांची भूमिका तर रामायणातील कपटी शूर्पणखेप्रमाणेच राहिली आहे. संजय राऊत यांनी यापूर्वीही अनेकवेळा नाक कापून घेतलं पण शूर्पणखेप्रमाणे त्यांचा अहंकार काही संपला नाही. आजही नाशिकमध्ये बोलताना संजय राऊत यांनी अहंकाराची भाषा केली. पण राऊतांनी हे लक्षात ठेवावं शूर्पणखेचं नाक लक्ष्मणानं कापलं होतं, येणाऱ्या निवडणुकीत जनता तुमच्या अहंकाराचं नाक कापल्याशिवाय राहणार नाही".