नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ, सरकारकडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा
Nitesh Rane Y plus Security: मागील काही दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे.
Nitesh Rane Y plus Security: भाजप नेते नितेश राणे यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यांना सरकारडून वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. भाजप नेते नितेश राणे हे लँड जिहाद, लव जिहादच्या विरोधात आक्रमक भूमिका घेत असतात. अशावेळी त्यांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजप आमदार नितेश राणेंच्या सुरक्षेत वाढ करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.
मागील काही दिवसांपासून नितेश राणे हिंदुत्वाबद्दल आक्रमक भूमिका घेताना दिसत आहे. ते राज्यभर मोर्चे काढत आहेत. कार्यक्रम करुन या मग आम्हाला फोन करा. आपला बॉस सागर बंगल्यावर बसला आहे आम्ही तुम्हाला काहीही होऊ देणार नाही. सुखरुप घरी सोडू, असे विधान नितेश राणे यांनी जाहीर सभेत केले होते. या विधानानंतर विरोधी पक्षांनी त्यांच्यावर टीका केली होती.
वफ्फ बोर्डाला टार्गेट
नाशिकमध्ये सकल हिंदू समाजातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी नितेश राणे यांनी वफ्फ बोर्डाला टार्गेट केले. हिंदू बांधव आपल्याच भूमित परका होतो आहे. सन 2047 पर्यंत या देशाचे इस्लामीकरण करण्याचा काही देशविघातक शक्तींचा डाव असल्याची टीका त्यांनी केली. ‘लव्ह जिहाद’ आणि ‘लॅण्ड जिहाद’सारख्या मोहिमा देशात आक्रमकपणे चालवून हिंदूंना लक्ष्य केले जात आहे. देशात रेल्वे आणि संरक्षण दलाची मिळून जितकी जमीन नाही तितकी जमीन एकट्या वफ्फ बोर्डाकडे असल्याचा दावा त्यांनी यावेळी केला. हिंदूनी एकत्र येत वफ्फ बोर्ड रद्द करायला हवा, असेही ते यावेळी म्हणाले.
शरीयत कायदा लागू करण्याचे प्रयत्न
नाशिकमधील शैक्षणिक संस्था आणि काही हिंदू देवस्थानांच्या जमीनींवरही वफ्फद्वारे अतिक्रमण केले आहे. वफ्फचे कायदे इस्लामीक देशात का लागू नाहीत? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. वफ्फ बोर्डात एकाही हिंदूचा समावेश नाही, या बोर्डाचे सर्व कायदे एकतर्फी आहेत.भारतात सीरिया आणि पाकिस्तान यांच्याप्रमाणे शरीयत कायदा लागू करण्याचे प्रयत्न असल्याची टीका त्यांनी यावेळी केली. राज्यातील सरकार महाआघाडीचे किंवा उद्धव ठाकरेंचे नसून ते हिंदूंचे सरकार असल्याचा टोला त्यांनी ठाकरे गटाला लगावला होता.
कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही
माळशिरस येथील तहसील कार्यालयात काही अधिकारी मुस्लिम तुष्टीकरण करीत असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला आहे. हिंदूंच्या कार्यक्रमात कोणती गाणी वाजवायची हे सांगणारे अधिकारी कोण? असा प्रश्न त्यांनी विचारला. कोणत्याही अधिकाऱ्याने आपल्याकडे वाकड्या नजरेने पाहिले तर त्याच्या कानाखाली 12 वाजवल्याशिवाय गप्प बसायचे नाही, असे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. पोलीस माझं काही वाकडं करु शकणार नाही. माझा बॉस सागर बंगल्यावर आहे. तसेच आता तुम्हाला वाचवायला लोकशाही आघाडीचे पवार किंवा उद्धव ठाकरे वाचवायला येणार नाहीत असेही ते म्हणाले होते.