आदित्य ठाकरेंच्या कारला दुचाकीने ठोकल्यानंतर नितेश राणेंचा गंभीर आरोप, म्हणाले `राऊतांप्रमाणे बनाव...`
Nitesh Rane on Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
Nitesh Rane on Aditya Thackeray: ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या कारला दुचाकीने धडक दिल्यानंतर भाजपा नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी गंभीर आरोप केला आहे. आपली सुरक्षा वाढवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना? याची चौकशी पोलिसांनी करावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिंधुदूर्गात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला.
"आजच्या सामनात आमचा तो बाब्या आणि तुमचा तो कारटा अस वाक्य वापरलं गेलं आहे. ते आपल्या मुलाला जी वागणूक देतात, ती इतर शिवसैनिकांना देत नाही. पूजा चव्हाण प्रकरणी जो नियम संजय राठोड यांना, तो नियम दिशा सालियान प्रकरणात आदित्य ठाकरेंना का नाही लावला. दुसऱ्याला सल्ले देण्यापेक्षा संजय राऊत यांनी स्वतःच्या मालकाला सल्ला द्यावा," असं नितेश राणे यावेळी म्हणाले.
"समान नागरी कायद्यावर ठोस भूमिका घेण्याची उद्धव ठाकरेंची हिम्मत नाही. सेना भवनात उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी मुस्लिम लोक आले होते. मग आता शिवसेना भवनाचं शुद्धीकरण करणार का? तुम्ही बाळासाहेबांचा फोटो काढा आणि भोंगा लावा. तुमच्यामध्ये बाळासाहेबांचं रक्त असेल, तर समान नागरी कायद्याला समर्थन देऊन दाखवा," असं आव्हानच नितेश राणे यांनी दिलं.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, "फडणवीस झोपेत बोलत नाहीत. त्यांनी तुमच्या मालकासकट सगळ्यांची झोप उडवली आहे. सकाळी पिऊन बोलत आहात, शुद्धीत या. संजय राऊत सुरवातीपासून हे सरकार जाणार असं बोलत आहेत. पत्राचाळचा निकाल कधीही लागेल. भांडुपमध्ये औटघटकेचे राहिले आहात. हिंमत असेल तर पत्राचाळमध्ये जा". उद्धव ठाकरेंनी समान नागरी कायदा मातोश्रीत आणावा असंही ते म्हणाले.
दरम्यान आदित्य ठाकरेंच्या कारला दुचाकीने धडक दिल्यासंबंधी बोलताना त्यांनी सांगितलं की, ज्याप्रमाणे संजय राऊतांनी स्वतःच्या धमकीचा बनाव रचला, त्याप्रमाणे सुरक्षा वाढविण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्रयत्न तर नाही ना याची चौकशी पोलिसांनी करावी.
"ती घटना झाली नाही, ती घडवली गेली असा माझा संशय आहे. शिवेसना भवनाबाहेर ही घटना घडवणं आणि आपली सुरक्षा वाढवणं यासाठी हा प्रयत्न असावा. जो भंपकपणा संजय राऊतांनी काही आठवडे आधी केली, तसाच आदित्य ठाकरेंनी करण्याचा प्रयत्न केला असेल असा थेट संशय आहे. मातोश्रीची सुरक्षा काढल्याने यांची झोप उडाली आहे. मुंबई पोलिसांनी याची सखोल चौकशी करावी. उगाच कोणालाही टार्गेट करण्याआधी या 420 लोकांचं यात काही हात नाही ना? हे प्रकरण रचलं गेलं आहे असा माझा थेट आरोप आहे," असं नितेश राणे म्हणाले आहेत.