मस्त्यविकासमंत्री नितेश राणे यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्याविषयी बोलताना आक्षेपार्ह विधान केलं आहे. आहे. केरळ हे राज्य मिनी पाकिस्तान असल्याचं नितेश राणे म्हणाले आहेत. नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसने टीका केली आहे. तर भाजपनंही नितेश राणेंच्या या वक्तव्याचा पक्षाशी संबंध नसल्याचं सांगितलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काँग्रेस आणि राहुल गांधींवर टीका करण्याच्या नादात भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केरळचा उल्लेख मिनी पाकिस्तान असा केलाय. हे कमी की काय अतिरेकी काँग्रेसला आणि राहुल गांधींना मतदान करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पुण्यातल्या पुरंदरमध्ये आयोजित एका जाहीर कार्यक्रमात त्यांनी ही मुक्ताफळं उधळली आहेत. 


नितेश राणेंच्या या वक्तव्यावर काँग्रेसमधून संतप्त प्रतिक्रिया आली आहे. केरळला मिनी पाकिस्तान म्हणणाऱ्या नितेश राणेंची मंत्रिपदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी काँग्रेसनं केली आहे. दुसरीकडे नितेश राणेंनी केरळ आणि काँग्रेसबाबत जे वक्तव्य केलंय ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत असल्याचं सांगत भाजपनं हात झटकले आहेत.


नितेश राणेंनी केलेल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं सांगितलंय. टीका करणाऱ्यांनी यावर प्रतिवाद करण्याचं आव्हानही त्यांनी दिलं आहे. भारताच्या कोणत्याही भूभागाचा किंवा लोकवस्तीला पाकिस्तान बोलू नये असा कोर्टानं आदेश दिला आहे. कोर्टाच्या या आदेशाचाही मंत्रिमहोदयांना विसर पडल्याचं दिसत आहे. अतिशय भडक वक्तव्य करणारे नेते म्हणून नितेश राणेंची ओळख आहे. महायुती सरकारमध्ये मंत्री झाल्यानंतर तरी त्यांनी अशी वक्तव्य टाळावीत अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.