कुडाळ : सिंधुदुर्ग - रत्नागिरी लोकसभा मतदार संघासाठी आपण निवडणूक लढविण्यास इच्छुक असल्याचे सांगत भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी आपल्या उमेदवारीचे संकेत दिले आहेत. त्यामुळे भाजपकडून त्यांना लोकसभेची उमेदवारी मिळणार का, याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, भाजपकडून शिवसेनेबरोबर युतीसाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्याबाबत भाजपने नमते घेतले आहे. त्यामुळे प्रमोद जठार यांना उमेदवारी मिळणार का, याचीही उत्सुकता आहे. तसेच भाजपने आपला उमेदवार जाहीर केला तर राणेंबरोबर शिवसेनाही नाराज होणार त्यामुळे भाजपपुढे आता पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, सिंधुदुर्ग- रत्नागिरीची जागा सध्या शिवसेनेकडे आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रमोद जठार यांच्या या भूमिकेने महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष नारायण राणे आणि शिवसेनेला धक्का मिळणार आहे. राणे आणि भाजप यांची युती झाल्यास राणेंचे पुत्र नीलेश राणे यांना तसेच शिवसेना भाजप युती झाल्यास विद्यमान खासदार विनायक राऊत यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. मात्र आता प्रमोद जठार यांनी निवडणूक लढवण्यास इच्छूक असल्याचे जाहीर केल्याने सर्वच पक्षांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागले आहे. 


प्रमोद जठार हे सध्या सिंधुदुर्ग भाजपचे अध्यक्ष आहेत. मात्र, त्यांनी राणे यांच्या भाजपमधून हकालपट्टी करण्याची मागणी केली होती. राणे हे भाजपकडून राज्यसभेचे खासदार आहेत. राणे हे भाजप नेतृत्वार टीका करतात, त्यामुळे त्यांची हकालपट्टीची मागणी जठार यांनी केली होती. त्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना जठार यांना समजावले होते. आता जठार यांनीच पक्षाचा निर्णय होण्यासाठी निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यामुळे भाजप आता काय निर्णय घेणार की मित्र पक्षांशी जुळवून त्यांना जागा सोडणार याची चर्चा सुरु आहे.