`पंकजांचं भाषण म्हणजे फडणवीसांवर पराभवाचं खापर फोडण्याचा प्रकार`
गोपीनाथ गडावरील भाषणावरुन भाजपमधूनच पंकजा यांना घरचा आहेर मिळाला आहे.
मुंबई : भाजप नेत्या पंकजा मुंडे परळीतल्या 'गोपीनाथ गडा'वर जोरदार शक्तीप्रदर्शन केलं. या भाषणावर भाजपमधूनच पंकजा यांना घरचा आहेर मिळाला आहे. भाजप खासदार संजय काकडे यांनी पकंजा यांच्यावर बोचरी टीका केली आहे. 'पंकजा मुंडे पद मिळवण्यासाठी दबाव गट तयार करत आहे अशा वावड्या उठवण्यात आल्या. पण मी म्हणते, मला हे मिळू नये यासाठीच हा प्रयत्न आहे का?' असा उलट सवालही त्यांनी यावेळी केला. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर या माध्यमातून त्यांनी निशाणा साधला होता.
संजय काकडे यांनी या मुद्द्यावर भाष्य केले आहे. पंकजा मुंडेंचं कालचं भाषण म्हणजे स्वतःच्या पराभवाचं खापर देवेंद्र फडणवीसांवर फोडण्याचा प्रकार असल्याचे काकडे म्हणाले. पंकजा मुंडे पक्षाला ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
पंकजा यांनी सत्तेत असताना कुठल्या समाजाचे प्रश्न सोडवले नाहीत म्हणून त्यांचा पराभव झाला. आता स्वतः अपयश झाकण्यासाठी त्या उपद्व्यापी वक्तव्य करत असल्याची टीका भाजपचे राज्यसभा खासदार संजय काकडे यांनी केली आहे.
'गोपीनाथ गडा'वर शक्तीप्रदर्शन
सोशल मीडियावर नाराजीचा सूर व्यक्त करणाऱ्या पंकजा मुंडे भाजप सोडणार का? अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. परंतु, 'मी पक्ष सोडणार नाही... पक्षाला मला सोडायचंय तर पक्षानं निर्णय घ्यावा' असं म्हणत पंकजा मुंडे यांनी या चर्चा खोट्या असल्याचं सांगितलं. 'मी पक्ष सोडावा अशी कुणाची इच्छा आहे का? कुणी या वावड्या उठवल्या?' असं म्हणत त्यांनी स्वकीयांवर निशाणा साधलाय.मला कुठल्याच पदाची अपेक्षा नाही, असं म्हणत कोअर कमिटीच्या जबाबदारीतून आपल्याला मुक्त करावं, अशी विनंती त्यांनी चंद्रकांत पाटलांकडे केली.