...म्हणून राज्यातल्या भाजप नेत्याने धुतले बँक मॅनेजरचे पाय
भाजप नेते सुरेश धस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
बीड : भाजप नेते सुरेश धस यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. २४ सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये सुरेश धस बँक मॅनेजरला मनवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. यासाठी त्यांनी गांधीगिरीचा सहारा घेतला. एका कार्यक्रमादरम्यान एसबीआयचे मॅनेजर आल्याचं धस यांना समजलं. यानंतर त्यांनी या बँक मॅनेजरचे पाय धुतले आणि शेतकऱ्यांच्या कर्जाच्या फाईल लवकर पास करण्याची विनंती केली.
शेतकऱ्यांच्या कर्जाची फाईल लवकर पास झाली पाहिजे, ज्यामुळे शेतकऱ्यांना वेळेवर पैसा मिळेल आणि ते शेतीची पुढची कामं करु शकतील, असं सुरेश धस म्हणाले. बँकेतून मिळणाऱ्या कर्जाला उशीर होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे, पण आपल्याकडे १,५०० शेतकऱ्यांच्या फाईल आल्याचं बँक मॅनेजर म्हणाले आहेत. यापैकी ४०० शेतकऱ्यांच्या फाईल तपासून पास केल्या आहेत, तर बाकी शेतकऱ्यांच्या फाईल लवकरच पास करू, असं आश्वासन मॅनेजरनी दिलं आहे.
२५ लाखांपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या बीडमध्ये ८० टक्के लोक ग्रामीण भागात राहतात, ज्यांचा शेती हाच व्यवसाय आहे. बीड लोकसभा मतदारसंघामध्ये ६ विधानसभा जागा येतात, ज्यात गेवराई, माजलगाव, आष्टी, केज, परळी आणि बीडचा समावेश आहे.