हिरॉईन शब्दाचा अर्थ डॅशिंग महिला, भाजप आमदाराची सारवासारव
आमदार लोणीकरांकडून महिला तहसीलदाराबद्दल केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण
नितेश महाजन, झी मीडिया जालना : जालना जिल्ह्यातील परतूरचे भाजप आमदार बबनराव लोणीकर हे महिला तहसीलदाराचा उल्लेख 'हिरोईन' असा केल्याने वादात अडकले होते. त्यांच्यावर चहुबाजून टीका होत होती. विरोधकांनी देखील त्यांना चांगलेच धारेवर धरले. आता लोणीकरांनी यावर सारवासारव केली आहे.
वाईट अर्थाने मी महिला तहसीलदारांना हिरोईन म्हणालो नसल्याचे म्हणत महिला तहसीलदाराबद्दल केलेल्या वक्तव्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.हिरोईन या शब्दाचा अर्थ डॅशिंग आणि कर्तबगार महिला असा होतो. तहसीलदार रूपा चित्रक या डॅशिंग महिला अधिकारी असून त्यांना मी वाईट हेतूनं हिरोईन म्हणालो नसल्याचे ते म्हणाले.
वादग्रस्त विधान
हेक्टरी 25 हजार रुपये अनुदान पाहिजे असेल तर मराठवाड्यातला सगळ्यात मोठा मोर्चा परतुरला करायचा का ? तुम्ही ठराव सगळ्याच सरपंचांनी आपल्या गावातून गाड्या आणल्या पाहिजे. जिल्हा परिषद सदस्य, प.समिती सदस्य सगळ्यांनी ताकद जर लावली तर महाराष्ट्रातील सर्वात मोठा मोर्चा होऊ शकतो.
अधिवेशनाच्या आधी जर मोर्चा झाला पंचवीस हजार लोक आले, पन्नास हजार लोक आले. तुम्ही सांगा देवेंद्र फडणवीसला आणा, तुम्ही सांगा चंद्रकांत दादा पाटलाला आणा, तुम्ही सांगा सुधीर भाऊला आणा, तुम्ही सांगा कुणाला आणायचं, तुम्हाला वाटलं तर सांगा नाही तर मंग एखादी 'हिरोइन' आणायची तर 'हिरोइन' आणा, नाही कुणी भेटलं तर तहसीलदार मॅडम हिरोइन आहेच. त्या निवेदन घ्यायला येईल तुमचं...
वक्तव्याचं भांडवल
विरोधकांनी माझ्या वक्तव्याचं भांडवल केल्याचा आरोप यावेळी लोणीकरांनी केला. विरोधकांनी गुगलवर जाऊन हिरॉईन या शब्दाचा अर्थ तपासावा असंही त्यांनी सांगितले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी प्रसिद्धी माध्यमांना गुगलच्या सर्च इंजिनवर जाऊन 'हिरॉईन' या शब्दाचा अर्थ काढणारे व्हिडीओ दाखवले.