कल्याण येथील भाजप आमदाराचा राजीनामा
कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी राजीनामा दिला आहे.
ठाणे : कल्याण पश्चिमेतील बंडखोर भाजप आमदार नरेंद्र पवार यांनी भाजप प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आपल्या भूमिकेमुळे पक्षाला त्रास होऊ नये यासाठी राजीनामा दिल्याची माहिती पवार यांनी दिली आहे. नरेंद्र पवार यांनी आपल्या फेसबुक पेजवर याबाबत पोस्ट शेअर करत राजीनाम्याची माहिती दिली आहे.
महायुतीने विधानसभा जागा वाटपात शिवसेनेला कल्याण पश्चिमची जागा सोडून माझ्यावर अन्याय केला आहे. यावरून व्यतिथ होऊन मी १ ऑक्टोबरलाच भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिला आहे. त्यानंतर मी कल्याण पश्चिम विधानसभेतून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढत असल्याने पक्षाला अडचण निर्माण होऊ नये यासाठी आज मी भाजपाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा देत आहे, अशी माहिती त्यांनी सोशल मीडियावरुन दिली आहे.
माझ्यावर अन्याय झाला आहे. त्यामुळे मी राजीनामा दिल्याने मला भारतीय जनता पार्टीपासून दूर जावे लागेल, मात्र मी कदाचित कुठे कमी पडलो? मलाही कल्पना नाही. २०१४ साली युती नसताना भाजपच्या तिकीटावर मी कल्याण पश्चिम विधानसभा लढवली आणि मी जिंकून आलो. पक्षाने मला काम करण्याची संधी दिली तेव्हा मी कल्याण, मुरबाड, अंबरनाथ, बदलापूर आदी परिसरासह संपूर्ण महाराष्ट्रात पक्षवाढीसाठी सामाजिक दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेऊन काम केले, असे असताना मला उमेदावारी नाकारण्यात आली, अशी खंत पवार यांनी व्यक्त केली आहे.