`अर्ध्या भाकरीसह उकडा भातपण मिळेल, थोडा संयम ठेवा`; अजित पवारांमुळे नाराज शिंदे गटाला सल्ला
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील (Shinde Faction) काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी आता वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे म्हणत ज्याला एक भाकरी हवी होती, त्याला अर्धीच भाकरी मिळेल असं म्हटलं. त्यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी सल्ला दिला आहे.
Maharashtra Political Crisis: अजित पवार (Ajit Pawar) सरकारमध्ये सहभागी झाल्याने शिंदे गटातील (Shinde Faction) काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. उद्धव ठाकरेंची साथ सोडल्यानंतर एकनाथ शिंदेंना समर्थन देणाऱ्या आमदारांनी अजित पवारांवरही सडकून टीका केली होती. निधी देताना आपल्याकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं त्यांचं म्हणणं होतं. त्यामुळे आता तेच अजित पवार सत्तेत सहभागी झाल्याने शिंदे गटातील काही आमदारांना भविष्याची चिंता सतावू लागल्याचं बोललं जात आहे. भरत गोगावले (Bharat Gogavle) यांनी यावर बोलताना आता वस्तुस्थिती स्वीकारली पाहिजे म्हणत ज्याला एक भाकरी हवी होती, त्याला अर्धीच भाकरी मिळेल असं म्हटलं होते. त्यावर आता भाजपा आमदार नितेश राणे यांनी सल्ला दिला आहे.
भरत गोगावले यांना नाराजीबद्दल विचारण्यात आलं असता ते म्हणाले होते की, "आता नाराज होऊन काय करणार? जी वस्तुस्थिती आहे ती स्विकारली पाहिजे. थोडी नाराजी आहेच. कारण ज्याला एक भाकरी हवी होती त्याला अर्धी आणि अर्धी होती हवी होती त्याला पाव मिळेल. सध्याचं राजकीय समीकरण घेऊन पुढे जायचं असेल तर खूश राहावं लागेल. सध्या मिळतीये तेवढ्या भाकरीत मी खूश आहे".
"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी राज्याच्या आणि देशाच्या हितासाठी जे काही निर्णय घेतले त्याला सहकार्य करणं क्रमप्राप्त आहे. अजित पवारांना कोणतं खातं द्यायचा हा निर्णय ते घेतील," असंही ते म्हणाले.
तसंच मंत्रिमंडळात तुम्हाला स्थान मिळेल का? विचारलं असता त्यांनी सांगितलं की, "आता तरी दिसायला पाहिजे. पहिल्या नंबरवरुन इथपर्यंत आलो आहे. आता समावेश होईल त्यामुळे काळजी नसावी. पहिल्या नऊमध्ये मी होतो, पण काही कारणास्तव थांबलो होतो. आता थांबण्याचं कारण नाही. जो विस्तार होईल त्यात मला स्थान असेल".
नितेश राणेंकडून संयम ठेवण्याचा सल्ला
दरम्यान नितेश राणे यांनी शिंदे गटातील आमदारांना संयम ठेवण्याचा सल्ला दिला आहे. "अर्ध्या भाकरीसह उकाडा भातही मिळेल. भाकरीसह उकडा भात खाण्याचीही सवय ठेवा. पोट भरेल याची हमी आहे", असं नितेश राणे पत्रकार परिषदेत म्हणाले.
"जे पाटण्यात जमले होते ते मोदींच्या विरोधात जमले होते. या सर्वांचा बुरखा फाडण्याचं काम कालच्या सभेत झालं आहे. महविकास आघाडीचे नेतेच नरेंद्र मोदी यांचे महत्व सांगत आहेत. प्रफुल्ल पटेल यांनीही मोदी विरोधी लोकांचे वस्त्रहरण केलं. अजित पवार यांना बाहेर काढण्याची सुपारी संजय राऊत यांनी घेतली होती," असंही नितेश राणे यांनी सांगितलं.
शरद पवार पक्षातील नेत्यांच्या बैठकीत मोदींची स्तुती करतात. मग जाहीर कार्यक्रमात ते मान्य करायला काय अडचण आहे अशी विचारणाही नितेश राणे यांनी केली आहे.