तुरुंगात जमीनीवर बसून नितेश राणे वाचतायत पुस्तक? काय आहे त्या व्हायरल फोटोमागचं सत्य
भाजप आमदार नितेश राणे यांना अधिक तपासासाठी पोलिसांनी गोव्याला नेल्याची सूत्रांची माहिती
मुंबई : शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना ४ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात आज सकाळी १०.०० ते ३.३० पर्यंत चौकशी केल्यानंतर सिधुदुर्ग पोलीस अधिक तपासासाठी आमदार नितेश राणे यांना घेऊन गोव्याला गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
नितेश राणे यांना पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात बाहेर काढलं, सकाळी सावंतवाडी पोलीस ठाण्यातून नितेश राणे यांना कणकवली पोलीस ठाण्यातही आणण्यात आलं होतं. नितेश राणे आणि त्यांचे पीए राकेश परब यांचीही समोरासमोर चौकशी करण्यात आली आहे.
नितेश राणे यांचा तो फोटो व्हायरल
दरम्यान, नितेश राणे यांना पोलीस कोठडी दिल्यानंतर त्यांचा तुरुंगात खाली बसून पुस्तक वाचत असल्याचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
पण या व्हायरल फोटो मागील सत्य आम्ही तपासलं असता हा फोटो आताचा नसल्याचं समोर आलं आहे. हा व्हायरल फोटो ५ वर्षांपूर्वीचा आहे. ५ वर्षांपूर्वी नितेश राणे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात वाळू प्रश्नावर गोंधळ घातला होता. याप्रकरणी त्यांना अटक करण्यात आली होती. त्यावेळचा हा फोटो असल्याचं समोर आलं आहे.
उद्या पोलीस कोठडी संपणार
दरम्यान, नितेश राणे यांची दोन दिवसांची पोलीस कोठडी उद्या संपत आहे, त्यानंतर उद्या पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्याची शक्यता आहे. कोर्टात नितेश राणे यांच्या जामीनासाठी उद्या पुन्हा त्यांच्या वकीलांकडून प्रयत्न करण्यात येतील. राणे यांना बेल मिळणार की पुन्हा जेल होणार हे उद्याच स्पष्ट होणार आहे.