Suresh Dhas on Walmik Karad Arrest: बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख (Santosh Dehsmukh) यांच्या हत्या प्रकरणात फरार असलेल्या वाल्मिक कराडला (Walmik Karad) अखेर अटक करण्यात आली आहे. आज पुण्यात वाल्मिक कराड शरण आल्यानंतर त्याला अटक करण्यात आली. वाल्मिक कराड गेल्या तीन आठवड्यांपासून फरार होता. यानंतर त्याचा सगळीकडे शोध सुरु होता. यादरम्यान त्याने व्हिडीओ पोस्ट करत आपण शरण येत असल्याची माहिती दिली. दरम्यान या प्रकरणावरुन रान पेटवणाऱ्या भाजपा आमदार सुरेश धस (Suresh Dhas) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असा आरोप त्यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"चांगली गोष्ट झाली आहे. पळून पळून कुठपर्यंत पळणार? पोलिसांच्या तावडीतून सुटणं इतकी सोपी गोष्ट नसते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी धडाधड निर्णय घेतली. सर्वात महत्त्वाचं म्हणजे संपत्ती जप्त करणं, खाती गोठवणं सुरु केल्याने त्याने शरण येण्याचा निर्णय घेतला असावा," असं सुरेश धस म्हणाले आहेत. 


तपासावर समाधानी आहात का? असं विचारलं असता ते म्हणाले, "इतरांनाही लवकरात लवकर अटक केली जावी. आकांनीच त्यांना मागे ठेवलं असेल. त्यांचा सांभाळ तेच करत असतील". हे प्रकरण टिकवण्यासाठी उज्वल निकम यांच्यासारखा तगडा वकील दिला पाहिजे, फास्टट्रॅकवर केस चालवली पाहिजे, लवकर चार्जशीट दाखल कऱणं आणि अंडर ट्रायल चालणं महत्वाचं आहे अशा अपेक्षाही त्यांनी व्यक्त केल्या आहेत. 


धनंजय मुंडे यांच्या राजीनामाच्या मागणीसंदर्भात विचारलं असता ते म्हणाले, "मी कधीही त्यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. ही मागणी त्यांच्याच पक्षाच्या आमदारांनी केली आहे". धनंजय मुंडे आणि वाल्मिक हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. शोले चित्रपटातील अमिताभ बच्चनचं नाणं ते आहेत असा आरोपही त्यांनी केला. 


"आमच्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद देवेंद्र फडणवीस यांनी घ्यावं ही माझी मागणी आजही आहे. त्यांनी पालकमंत्रीपद घेतल्याशिवाय हा बीड जिल्हा जिथे गँग्स ऑफ वासेपूर वाल्मिक आणि त्यांच्या कंपनीने निर्माण केलं आहे ते सरळ होणार नाही. साहेब आल्यास हे सगळं होईल आणि विकासाचाही समतोल राखला जाईल," अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे. धनंजय मुंडे मंत्रीपदी राहिल्यास काही गोष्टी मॅनेज करु शकतात. पण आम्ही मुख्यमंत्र्यांनी तसं होऊ देऊ नका सांगू असंही त्यांनी म्हटलं.