... अन् चक्क आमदारांनी खेळला संगीत खुर्चीचा खेळ
एडमाकोटमध्ये मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तिच्या कार्यक्रमात आमदारांनी संगीत खुर्चीचा खेळ खेळला
प्रवीण तांडेकर, झी मीडिया, गोंदिया : गोंदियाच्या तिरोडा - गोरेगाव विधानसभा क्षेत्रात आमदार विजय रहांगडाले यांचा संगीत खुर्ची खेळतानाचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. विजय रहांगडाले यांनी आपल्या पदाधिकाऱ्यासोबत संगीत खुर्ची खेळतानाचा व्हिडीओ समोर आला आहे.
एडमाकोटमध्ये मुख्याध्यापकांच्या सेवानिवृत्तिच्या कार्यक्रमात आमदारांनी संगीत खुर्चीचा खेळ खेळला. या कार्यक्रमात विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. संगीत खुर्चीचा खेळ बघून आमदार रहांगडालेंना खेळण्याचा मोह आवरला नाही. आमदार रहांगडालेंनी सुद्धा खेळात सहभागी होऊन आनंद लुटला.
आमदार रहांगडाले आणि संगीत खुर्चीचा खेळ -
संगीत खुर्ची खेळाला सुरुवात झाली. गाणं सुरु झालं आणि सगळ्यांनी खुर्चीच्या आजूबाजूला गिरक्या घालण्यास सुरुवात केली. सगळ्यांचं लक्ष गाणं कधी संपतंय याच्याकडे होतं. जसं गाणं संपलं तसं लगेच विजय रहांगडालेंनी खुर्ची पकडली. एका मुत्सद्दीराजकारणी प्रमाणे भाजप आमदार विजय रहांगडाले यांनी स्वत:ची खुर्ची पकडली.
राहंगडाले यांच्या मुलाचे वर्धात अपघाती निधन -
नुकतेच जानेवारी महिन्यात आमदार विजय रहांगडाले यांच्या मुलाचे कार अपघातात निधन झाले. एकुलत्या एक मुलाच्या निधनामुळे विजय रहांगडालेंवर दुखाचे डोंगर कोसळले. मुलाच्या निधनानंतर रहांगडाले यांनी भावूक फेसबुक पोस्ट शेअर केली होती.