मुंबई : फुले, शाहू, आंबेडकरांच्या नावानं मत मागून, इथल्या वंचित शोषित घटकांच्या भावनांचा खेळ करत महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. पण, आघाडीची सत्ता आली की दलित, वंचित, शोषित घटकावर अत्याचार वाढतात ही गोष्ट पुन्हा एकदा स्पष्ट झाल्याचा आरोप भाजप आमदार राम सातकर यांनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमरावतीच्या सावंगी मग्रापुर गावातील दलित बहूल वॉर्डात महिनाभरापासून पाणी नाही. त्यामुळे या गावातील दलितांनी गाव सोडून वेशीवर ठिय्या मांडला आहे. या घटनेची बातमी झी २४ तासने दाखविली होती. यावरून माळशिरस मतदारसंघाचे भाजप आमदार राम सातकर यांनी आघाडी सरकार आणि सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली आहे.


मग्रापुर गावातील सरपंचांनी हेतूपूरस्पर दलित बहूल वार्डातील पाण्याचे कनेक्शन तोडले. त्याचा निषेध म्हणून अनेकांनी गाव सोडून वेशीवर ठिय्या मांडलाय.   या जीवघेण्या थंडीत आमच्या आई, बहिणी गावच्या वेशीवर ठिय्या मांडून बसल्या होत्या. हा फक्त पाण्यापुरता विषय नाही. 


गावातील दलित बांधवांवर हा सरळ सरळ सामाजिक बहिष्कार घालत असून हा मोठा गुन्हा आहे. सत्ता उपभोगणाऱ्यांनी आज दलितांवर पाण्यासाठी पुन्हा सत्याग्रह करण्याची वेळ आणलीये. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी या प्रकरणाची दखल घेत समिती स्थापन करावी. या घटनेची तातडीने चौकशी करून संबंधित सरपंच, उपसरपंचावर कारवाईचे आदेश द्या अशी मागणी आमदार राम सातकर यांनी केली आहे.


बार्टी नेमकी कुणासाठी?


वंचित घटकाच्या कल्याणासाठी उभारलेली बार्टी संस्था वंचित घटकांना लाभ देण्यासाठी सावकारासारखं वागते. बील काढण्यासाठी पार्ट्या द्याव्या लागतात. मग, बार्टी संस्था नेमकी कुणासाठी आहे? या संस्था म्हणजे आपल्या जहागिऱ्या नाहीत याचे भान ठेवा. हा भोंगळ प्रकार कुणाच्या आशिर्वादानं सुरू आहे? असा सवालही आमदार सातकर यांनी सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांना केलाय.