कर्जमाफीवरून भाजप खासदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा अहेर
राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून आता अनेक आठवडे लोटले आहे. मात्र अजूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या गोंधळाने शेतकरी हैराण झाले आहेत.
मुंबई : राज्य सरकारने शेतक-यांसाठी कर्जमाफीची घोषणा करून आता अनेक आठवडे लोटले आहे. मात्र अजूनही यावर अंमलबजावणी झालेली नाही. त्यात ऑनलाईन अर्ज भरण्याच्या गोंधळाने शेतकरी हैराण झाले आहेत.
अशात भंडारा-गोंदियातील भाजपचे खासदार नाना पटोले यांनी फडणवीस सरकारच्या या कर्जमाफीवर जोरदार टीका केली आहे. फडणवीस सरकार शेतकऱ्यांप्रती असंवेदनशील असून शेतकऱ्यांना कर्जमाफीचा थेट लाभ देण्याऐवजी सरकारने कधीही अंमलात न येणारी कर्जमाफीची योजना तयार केली आहे, अशी बोचरी टीका पटोले यांनी केली आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'शी बोलताना नाना पटोले यांनी ही टीका केली आहे. विदर्भ आणि मराठवाड्यात शेतकरी आत्महत्या करत आहेत. मात्र सरकार गांभीर्याने लक्ष देत नाही. मुख्यमंत्री म्हणतात शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी हा ऐतिहासिक निर्णय आहे. पण या ऐतिहासिक निर्णयाची अंमलबजावणी होईल की नाही, याबाबत साशंकता आहे, असे पटोले हे म्हणाले.
यासोबतच ऑनलाईन अर्ज भरण्याच्या प्रक्रियेवरही त्यांनी जोरदार हल्ला चढवला. ‘कर्जमाफीचे अर्ज सादर करण्यास कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर सक्षम आहेत की नाही, याबाबतही सांशकता असल्याचं त्यांनी सांगितलं. भाजपच्याच खासदाराने राज्यातील भाजप सरकारवर टीका केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. पहिल्यांदा एका मोठ्या नेत्याने आपल्याच पक्षाच्या कारभारावर अशी टीका केल्याने भाजपमध्ये गोंधळाचे वातावरण आहे.
दरम्यान, शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीचे ऑनलाईन भरण्याची प्रकिया २४ जुलै २०१७ पासून सुरु झाली आहे. आतापर्यंत कर्जमाफीसाठी १० लाख ११ हजार शेतकऱ्यांचे ऑनलाईन अर्ज आल्याची माहती सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.