Ajit Pawar : महायुतीमधील अंतर्गत वाद विकोपाला गेला आहे. पिंपरीमध्ये भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवार गटाविरोधात  मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महायुतीमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. निवडणुकीच्या प्रचारावर याचा परिणाम होऊ शकतो. तर, दुसरीकडे विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर महायुतीतील तीन ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांच्या मॅरेथाॅन बैठका सुरू आहेत. 


अजित पवार पक्षाविरोधात ठराव


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पिंपरीमध्ये भाजपनं अजित पवार पक्षाविरोधात ठराव मंजूर केला आहे. विधानसभा निवडणुकीत अजित पवार पक्षाच्या उमेदवाराचा प्रचार करायचा नाही, असा ठराव भाजप कार्यकर्त्यांच्या बैठकीत मंजूर करण्यात आला. लोकसभेत अजित पवारांच्या पक्षानं महायुतीचा प्रचार केला नाही. त्यामुळे  घडाळ्याचा प्रचार का करायचा? अशी भूमिका अनेकांनी मांडली. ही जागा भाजपला द्यावी अशी मागणीही देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडे केली जाणार असल्याचं कार्यकर्त्यांनी म्हटलंय. 


राज्यात विधानसभा निवडणुका तोंडावर आल्यानं राजकीय वातावरण तापलंय. सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरू केलीय .मात्र, गेल्या काही दिवसांपासून महायुतीमध्ये अंतर्गत वाद सुरू असल्याचे पाहायला मिळाले. अजित पवार हे महायुतीतच्या भाजप आणि शिंदे शिवसेनेतील नेत्यांना खटकत असल्याचं चित्र निर्माण झाले होते.  विधानसभेच्या निवडणुका जवळ आल्यानंतर राष्ट्रवादीवर टीका केल्यास नुकसानच होणार असल्यानं केंद्रीय नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेससोबत होणार वादविवाद टाळण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळतेय.  लोकसभा निवडणूकीमध्ये महायुतीला अपेक्षित यश मिळालं नाही. या पराभवाचं खापर अजित पवार यांच्या माथी मारण्यात आलं. मताचं ट्रान्सफर न झाल्यानं महायुतीतील उमेदवारांचा पराभव झाला,असं बोललं जात होतं. 


भाजपशी मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं देखील अजित पवारांच्या युतीमधील सहभागावरील प्रश्न उपस्थित केले. त्यानंतर शिंदे शिवसेनेचे नेते आणि मंत्री तानाजी सावंत यांनी मंत्रिमंडळात राष्ट्रवादीसोबत बसल्यावर उलट्या होतात,असं धक्कादायक वक्तव्य केलं.  तानाजी सावंत यांच्यानंतर भाजपचे प्रवक्ते गणेश हाके यांनी अजित पवार यांच्यासोबतची युती असंगाशी संग अशी असल्याची टीका केली. तसेच पुण्यातील वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे आमदार सुनिल टिंगरे आणि भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांच्यातही वाद पाहायला मिळाला. महायुतीतल्या या वादामुळे  सर्व काही आलबेल नसल्याचं चित्र दिसून येत होतं.  स्थानिक वादाचा फटका विधानसभेत बसू नये यासाठी स्थानिक नेतृत्त्वाला राष्ट्रवादीशी जुळवून घेण्याचे आदेश भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी मुंबई दौऱ्यात दिले आहेत.