कोल्हापूर: भाजपाचे कार्यकर्ते पूरग्रस्तांसाठीची आर्थिक मदत बोगस नावे टाकून लाटत असल्याचा घणाघाती आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केला आहे. यावेळी त्यांनी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.  हा सगळा पैसा आपल्या बापाचा आहे, त्यामुळे हे पैसे कार्यकर्त्यांना वाटू, असे चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल. मात्र आपण गप्प बसणार नाही. गरज पडल्यास हाती दांडके घेऊ, असा इशारा शेट्टींनी दिला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बोगस पूरग्रस्तच मदत लाटत असल्याचा गौप्यस्फोट 'झी २४ तास'ने केला होता. यावरून कोल्हापुरातील शिरोळच्या नवे दानवाड गावात तुंबळ हाणामारी झाली. खऱ्या पूरग्रस्तांना डावलल्याने संताप अनावर झाला आणि या संतापाचे रुपांतर हाणामारीत झाले होते. 


पूरग्रस्तांसाठी सरकार आणि संपूर्ण राज्यभरातून आर्थिक मदतीचा ओघ येत आहे. मात्र, गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवकांना हाताशी धरून पूरग्रस्तांची आर्थिक मदत दुसऱ्यांच्याच खिशात घालण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. 


रेशन दुकानाचा परवाना असलेला आणि संस्थेचा सेक्रेटरी असलेल्या प्रकाश तिपन्नवार याच्या घरावर गावकरी चालून गेले होते. ग्रामस्थ आणि तिपन्नवार कुटुंबिय यांच्यामध्ये यावरुन जोरदार हाणामारी झाली. तिपन्नवार यांच्या सांगण्यावरून तलाठ्याने पूरग्रस्तांची यादी तयार केल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. 


पुराचे पाणी घरात शिरलेल्या कुटुंबीयांना रोख ५ हजार आणि बँक खात्यावर ५ हजार अशी १० हजारांची मदत राज्य सरकार देत आहे. मात्र, गावपातळीवर सरकारच्या या योजनेचा बोऱ्या वाजलाय. ग्रामसेवक आणि तलाठी यांनी बनवलेल्या पूरग्रस्तांच्या यादीत खऱ्या लाभार्थींना दूर ठेवून ज्यांच्या उंबरठ्यालाही पाणी शिवलेले नाही त्यांनीच मदत लाटल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती.


गावातले पुढारी आणि त्यांचे सगेसोयरेच या आर्थिक मदतीवर डल्ला मारत असल्याचा आरोप पूरग्रस्त करत आहेत. ज्यांचा संसार या पुरात वाहून गेला त्यांना मात्र १० हजारांच्या मदतीसाठी तलाठ्याचे उंबरठे झिजवावे लागत आहेत, असेही ग्रामस्थांनी 'झी २४ तास'शी बोलताना सांगितले होते.