मुंबई : विधानसभा निवडणुकांची घोषणा झाल्यापासून राजकीय वातावरणात गरमागरमी पाहायला मिळत आहे. प्रत्येक पक्षाने मतदार राजावर प्रभाव पाडण्यासाठी विविध तंत्र वापरण्याची युक्ती लढवली आहे. या साऱ्या वातावरणात भाजपाकडून लोकसभेप्रमाणेच विधानसभा निवडणुकांसाठी पुन्हा एकदा मोदी कार्डाचा वापर करण्यात येणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आगामी निवडणुकांसाठीचं पूरक वातावरण पाहता, भाजपाकडून खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे प्रचारसभांच्या माध्यमातून मतदारांना संबोधित करणार आहेत. सध्या हाती आलेल्या माहितीनुसार मोदी एकूण १० प्रचारसभा घेणार आहेत. तर, अमित शाह २० प्रचारसभांमध्ये सहभागी होणार आहेत. 


भाजपकडून या प्रचारसभांचं नियोजन करण्यात आलं आहे. पण, त्याचं वेळापत्रक मात्र समोर आलेलं नाही. असं असलं तरीही विरोधकांसाठी मात्र आता या प्रचारसभा आव्हान देणाऱ्या ठरणार हे खरं. कारण, भाजपाकडून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी पुन्हा एकदा मोदी कार्डाचा वापर करण्य़ात येणार आहे. ज्यामध्ये अनुच्छेद ३७० रद्द करण्याचा मुद्दा आणि जम्मू काश्मीर मुद्दा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. 


एकिकडे भाजपाकडून मोदी कार्ड वापरण्याच्या तंत्राचा अवलंब केला जाणार असतानाच दुसरीकडे विरोधी पक्षांक़डून बेरोजगारी, आर्थिक मंदीच्या उंबरठ्यावर उभा असणारा देश आणि एकंदर जनतेमध्ये असणाऱ्या असंतोषाच्या माध्यमातून मोदी कार्डाला आव्हान देण्यात येणार आहे. तेव्हा आता निवडणुकांच्या या रणधुमाळीत सर्वस्व अर्पण करणाऱ्यांपैकी कोणाच्या पारड्यात यश जाणार हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे.