पुणे: भारतीय जनता पक्षाचे चाणक्य मानले जाणारे अमित शहा पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांना चाणक्य नितीचे धडे देणार आहेत. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीतर्फे शहा यांच्या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलय. आर्य चाणक्य - आजच्या संदर्भात हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गणेश कला क्रिडा मंचामध्ये सायंकाळी साडेपाच वाजता हा कार्यक्रम होणार आहे. मात्र, अमित शहा पक्षाच्या सोशल मिडिया सेलच्या कार्यकर्त्यांशी कार्यक्रमापूर्वी संवाद साधणार आहेत. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम होणार आहे.


बाबासाहेब पुरंदरेंची घेणार भेट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा रविवारी पुणे दौऱ्यावर आहेत. कार्यकर्त्यांशी संवाद तसेच व्याख्याना व्यतिरिक्त अमित शहा पुण्यामध्ये मुक्कामाला असलेल्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज तसेच तुकाराम महाराजांच्या पालख्यांचं दर्शनदेखील घेणार आहेत. व्याख्यानाच्या कार्यक्रमानंतर शहा त्यांच्या ‘संपर्कातून समर्थन’ अभियानांतर्गत शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंची त्यांच्या घरी जाऊन भेट घेणार आहेत.


अमित शहा यांचा पुणे दौरा भरगच्च 


एकूणच अमित शहा यांचा पुणे दौरा भरगच्च असा आहे. या सगळ्यादरम्यान शहा आगामी लोकसभा निवडणूकीच्या दृष्टिकोनातून पुण्यातील पक्ष संघटन तसेच पक्षाच्या कामाचा आढावाही घेणार आहेत. त्यामुळे अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्याबदद्ल मोठी उत्सुकता आहे. कार्यक्रम काहीही असले तरी त्यातून राजकारण साधलं जायला पाहीजे हे भाजपचे चाणक्य जाणून असल्याचं त्यांच्या दिवसभराच्या कार्यक्रमांवरुन लक्षात येतं.