कोल्हापूर: गेल्या सहा दिवसांपासून कोल्हापूर आणि सांगलीत पूरपरिस्थितीमुळे नागरिकांची दुर्दशा झाली आहे. अशावेळी राज्याच्या इतर भागांतील लोक सांगली व कोल्हापूरकरांना जमेल ती मदत करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्येही भाजपला चमकोगिरीचा मोह आवरताना दिसत नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पूरात अडकलेल्या नागरिकांना सरकारी यंत्रणांकडून धान्य आणि पाणी पुरवले जात आहे. मात्र, या मदत साहित्यावरही स्वत:ची आणि पक्षाची जाहिरात करणारे स्टिकर्स लावण्याचा प्रताप आमदार सुरेश हाळवणकर यांनी केला आहे. सुरेश हाळवणकर हे भाजपचे इचलकरंजीमधील आमदार आहेत. 


या भागात शासकीय यंत्रणांकडून रस्त्यावर आलेल्या नागरिकांना धान्यवाटप करण्यात आले. मात्र, धान्याच्या पिशव्या हातात आल्यानंतर अनेकांना धक्का बसला. धान्याच्या या पिशव्यांवर देवेंद्र फडणवीस, आमदार सुरेश हळवणकर आणि भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांची नावे लिहली होती. 


हा प्रकार लक्षात आल्यानंतर नागरिकांनी संताप व्यक्त केला. यानंतर भाजपच्या जाहिरातबाजीचे स्टिकर्स लावलेले हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. 


अभूतपूर्व अशा पूरपरिस्थितीमुळे कोल्हापूरमधील हजारो कुटुंबीयांचे संसार उद्ध्वस्त झाले आहेत. मात्र, अशा परिस्थितीमध्येही भाजपला स्वत:ची जाहिरातबाजी करण्याचा मोह आवरत नसल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त केला जात आहे. 


तत्पूर्वी शुक्रवारीही राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यामुळेही भाजप वादात सापडला होता. गिरीश महाजन यांनी शुक्रवारी कोल्हापूरमधील पूरग्रस्त भागाचा दौरा केला. यावेळी ते बोटीतून पूरग्रस्त भागाची पाहणी करत होते. त्यावेळी बोटीतील एका पोलीस अधिकाऱ्याने सेल्फी घेण्याचा धडाका लावला होता. त्याने गिरीश महाजन यांच्याकडे कॅमेरा नेल्यानंतर त्यांनीही हात उंचावून हसत प्रतिसाद दिला. हा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर गिरीश महाजन यांच्यावर टीकेची झोड उठली होती. 


गिरीश महाजन पूरपर्यटन करत आहेत का, असा सवाल अनेकांनी उपस्थित केला. पुराच्या पाण्यात बोटिंग करण्याची हौस भागवून घेणारे महाजन यांनी टीकेनंतर शुक्रवारी सांगलीत पाण्यात उतरून पूरग्रस्तांची भेट घेतली. मात्र, याही ठिकाणी त्यांना पूरग्रस्तांच्या रोषाला सामोरे जावे लागले. अखेर नागरिकांचा संताप पाहून त्यांना काढता पाय घ्यावा लागला होता.