ठाणे : टोलच्या आंदोलनाचं काय झालं, असा प्रश्न काही पत्रकार मला विचारत असतात पण भाजप-शिवसेनेने २०१४ ला टोलमुक्त महाराष्ट्राचं आश्वासन दिलं होतं, त्यांना का नाही विचारलं जात की कधी बंद होणार टोल? त्यांना का नाही विचारत तुमचे काय आर्थिक लागेबांधे आहेत टोलच्या राजकारणात? असा हल्लाबोल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रेल्वे परिसरात फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले. त्यावेळी ते बोलत होते. फेरीवाल्यांना हटवणे हे आमचं काम नाही, ते सरकारचं काम आहे पण  ते सरकारला जमलं नाही म्हणून आम्ही केलं. आज जी स्टेशन्स दिसत आहेत ती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी करून दाखवलं. आजपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जी जी आंदोलनं केली ती आंदोलनं कायदा मोडणाऱ्यांच्या विरोधात होती आणि तरीही तुम्ही आमच्यावर कारवाई करणार?, असा थेट सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला.


आमच्या आंदोलनानंतर राज्यातील ६४ टोल बंद झाले. मनसेच्या आंदोलनामुळेच टोल बंद झाले, मात्र आम्हाला मांडवली केली म्हणून प्रश्न विचारतात, असा संताप राज यांनी यावेळी व्यक्त केला.


दरवर्षी फेरीवाल्यांकडून २ हजार कोटींचा  हप्ता पोहोचवला जात आहे. यात एवढी मोठी आर्थिक उलाढाल आहे, म्हणून हे सगळे राजकीय पक्ष फेरीवाल्यांच्या बाजूने उभे आहेत . माझ्या महाराष्ट्र सैनिकाना एकटं पाडायचा प्रयत्न करताय. पण तुम्ही आम्हाला एकटं पाडू शकत नाही, कारण आमच्या पाठी महाराष्ट्राची जनता उभी आहे, असे राज ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.