Chandrashekhar Bawankule on Uddhav Thackeray:  युवासेनेच्या पदाधिकारी रोशनी शिंदे (Roshni Shinde) यांना मारहाण मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावरुन राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिवसैनिकांकडून ठाकरे गटाच्या रोशनी शिंदेंना मारहाण झाल्याचा आरोप आहे. ठाकरे गटाच्या आंदोलनानंतर तक्रार दाखल केली गेली. तर, रोशनी शिंदे यांच्यावर आयसीयू कक्षात उपचार सुरु आहेत. या सर्व घटनेनंतर उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सर्वात मोठा हल्लाबोल केला. यानंतर आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(Chandrashekhar Bawankule) यांनी थेट उद्धव ठाकरे यांना धमकीच दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उद्धव ठाकरेंनी फडणीस यांच्यावर कडक शब्दांत टीका केल्यामुळे भाजप आक्रमक झाली आहे. उद्धव ठाकरेंनी अशा शब्दांत पुन्हा टीका केली तर त्यांना घराबाहेर पडू देणार नाही असा सज्जड इशाराच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. तसेच उद्धव ठाकरे घरकोंबडा असल्याची टीका देखील बावनकुळे यांनी केली.  त्यामुळे भाजप आणि ठाकरेंमधला संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.


दरम्यान, भाजप आमदार नितेश राणेंनी अत्यंत शेलक्या शब्दांत उद्धव ठाकरेंवर प्रतिहल्ला चढवलाय. 'आधी पोलीस संरक्षण बाजूला ठेवा, मग फडणवीसांना बोलण्याची हिंमत दाखवा', असं आव्हान राणेंनी दिलं. ठाकरेंची मच्छर मारण्याची हिंमत नाही, असंही ते म्हणाले.


देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार


उद्धव ठाकरेंच्या टीकेला देवेंद्र फडणवीसांनीही लागलीच प्रत्युत्तर दिलंय. दोन मंत्री जेलमध्ये गेलेत मात्र तरीही तुम्ही कारवाईची धमक दाखवली नाहीत. वाझेसमोर लाळघोटेपणा कुणी केला. त्यामुळे फडतूस कोण हे महाराष्ट्राला माहित आहे अशा शब्दातफडणवीसांनी पलटवार केला आहे.


उद्धव ठाकरे काय म्हणाले होते?


उद्धव ठाकरेंनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर  जोरदार टीकास्त्र सोडले. फडतूस गृहमंत्र्यांना पदावर राहण्याचा अधिकार नाही, फडणवीसांना झेपत नसेल तर राजीनामा द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केलीय. तर, एकनाथ शिंदे मुख्यमंत्री की गुंडमंत्री? असा जोरदार घणाघातही उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांवर केला.


ठाण्यात नेमकं घडल तरी काय?


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यात शिंदे आणि ठाकरे गटात जोरदार मारहाण झालीय. यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिका-याला शिंदे गटाकडून मारहाण केल्याचा आरोप करण्यात येतोय. रोशनी शिंदे या ठाकरे गटाच्या युवासेनेच्या कार्यकर्त्या आहेत. फेसबुकवर आक्षेपार्ह पोस्ट केल्याचा आरोप करत शिंदे गटाने रोशनी शिंदेंना मारहाण केली. ही संपूर्ण मारहाण सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. ठाकरे गटाने मध्यरात्री कासारवडवली पोलीस स्टेशनबाहेर आंदोलन केलं, त्यानंतर तक्रार नोंदवण्यात आली. मात्र अजून एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. रोशनी शिंदेला उपचारासाठी खासगी रुग्णालयात आयसीयूत दाखल करण्यात आले आहे.