महाविकास आघाडीतून बाहेर पडा; भाजप नेत्याचे उद्धव ठाकरे यांना आवाहन
उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे.
प्रशांत परदेशी, झी मीडिया, नंदुरबार : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे(Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे हे सातत्याने भाजप तसेच भाजप नेत्यांवर टीका करत आहेत. या टीकेवरुन भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे(BJP state president Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरे यांना महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. सामनातून भाजपाच्या आंदोलनावर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडत आपले सावरकर प्रेम दाखवावे असे आव्हान चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहे(Maharashtra Politics).
सध्या गुजरात विधानसभेच्या प्रचाराला वेग आला आहे. महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी भाजपा नंदुरबार कार्यालयाला भेट दिली. यावेळी बावनकुळे यांनी सामनातून करण्यात आलेल्या टीकेचा चांगला समाचार घेतला. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांना थेट महाविकास आघाडी सोडण्याचा आव्हान त्यांनी यावेळी दिले. उद्धव ठाकरेंना जे बोलायचं असतं ते सामानाच्या अग्रलेखातून लिहिलं जात असतं. राहुल गांधींच्या वक्तव्याच्या विरोधात भाजपाने सुरू केलेल्या आंदोलनावर सामनातील अग्रलेखातून टीका झाल्यानंतर भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी टीकेला उत्तर दिले आहे.
उद्धव ठाकरे काँग्रेसधार्जिण झाले असून त्यांच्यात आणि त्यांच्या टीम मध्ये धमक असेल तर त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावे असे आवाहन बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे यांना दिले आहे. राज्यपाल यांनी केलेल्या शिवाजी महाराजांचा संदर्भातील वक्तव्यावर देखील बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली. छत्रपती शिवाजी महाराज आम्हा सर्वांना आदर्श आणि वंदनीय आहेत. त्यामुळे राज्यपाल कोणत्या अर्थाने बोलले हे आम्हाला माहीत नाही अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
भारत जोडो यात्रेत बुलढाणा येथील सभेत शेतकऱ्यांना श्रद्धांजली वाहत असताना फटाके फोडण्यात आल्याने राहुल गांधी यांनी संताप व्यक्त केला होता. भारत जोडो यात्रेत फटाके फोडणारे काँग्रेसचे अती उत्साही कार्यकर्ते होते त्यांनीच फटाके फोडले असतील अज्ञात व्यक्ती त्यांच्या कार्यक्रमात कशाला जातील असा प्रश्न भाजपा प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी उपस्थित केला आहे.