औरंगाबाद : भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आज देशव्यापी उपोषण केलं. संसदेत आपल्या विविध मागण्यांसाठी विरोधकांनी केलेल्या गोंधळानंतर कामकाज ठप्प झाले होते. याचा निषेध म्हणून हे उपोषण करण्यात आलं. या उपोषणाचे फोटो भाजपाच्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत पण जनतेच्या कॅमेऱ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामध्ये ऐटीत बसलेले भाजपा प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांचा फोटो सोशल मीडियात चर्चेत आहे. खुमासदार भाषणाच्या शैलीसाठी ओळखले जाणारे रावसाहेब ऐटीत उपोषणाला बसलेले फोटोत दिसत आहेत. औरंगाबाद येथे ते आज उपोषणासाठी बसले होते.



सॅण्डवीच खाऊन उपोषण 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


एकीकडे काँग्रेसच्या छोले भटूरे आंदोलनानंतर प्रचंड काळजी घेण्यात आलेल्या भाजपच्या आंदोलनानंतर सँडविचचा व्हिडीओ समोर आलाय. भाजपचे दोन आमदार बाळा भेगडे आणि भीमराव तापकीर यांचा उपवास सुटला. हे दोघे बालगंधर्व रंगमंदिरासमोर सुरू असलेल्या उपोषणामध्ये काही वेळ सहभागी झाले. त्यानंतर हे दोघे डीपीडीसीच्या मीटिंगसाठी काउन्सिल हॉलला पोहचले. तिथे पालकमंत्री गिरीश बापट आणि जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या उपस्थितीत खरीप हंगाम आणि जलयुक्त शिवार योजनेची बैठक होती. बैठक सुरू झाली आणि प्रथेप्रमाणे समोर प्लेट्स आल्या. सँडवीच, वेफर्स आणि बर्फी असे खाद्यपदार्थ समोर आले. दोन्ही आमदार महोदयांनी त्याचा आस्वाद घेतला आणि उपोषण सुटलं.



देशव्यापी उपोषण 



संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवशेन विरोधकांनी गोंधळ घालून वाया घालवल्याने भाजपाने आज देशव्यापी उपोषण केले. पंतप्रधान नरेंद्र मोदीही यामध्ये सहभागी झाल्याचे सांगितले जात आहे. विरोधी पक्षांनी गोंधळ घालून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात कामकाज रोखून धरल्याचा निषेध करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाचे सर्व खासदारांनी आज उपोषण केले. पंतप्रधानांनी दैनंदिन कामात व्यग्र राहूनच उपवास केल्याचे वृत्त आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह हे कर्नाटकात हुबळीला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विलेपार्लेमध्ये उपोषणात सहभागी झाले.



राष्ट्रवादीकडून जोरदार टीका



दरम्यान, भाजपचे खासदार करत असलेले उपोषण हे ढोंग असल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेय.



राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे राज्यभर सुरु असलेल्या हल्लाबोल यात्रेच्या पुण्यातील सभेत त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, धनंजय मुंडे, जयंत पाटील, सुनील तटकरे उपस्थित होते. त्यांनीही मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली.