मुंबई : राज्यातील मंदिरे सुरु करण्याच्या मागणीसाठी महाराष्ट्रातल्या विविध धार्मिक संस्था आणि प्रमुख देवस्थानांच्या वतीने 29 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता राज्यभर घंटानाद आंदोलन होणार आहे. भारतीय जनता पक्षाने देखील आता या आंदोलनाला संपूर्ण पाठिंबा जाहीर केला आहे. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेण्याच्या सूचना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केल्या आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं की, 'भाजपच्या कार्यकर्त्यांनी या आंदोलनात सहभागी होताना फेस मास्क वापरावे, फिजिकल डिस्टन्सिंग पाळणे तसेच इतर कोरोनासाठीच्या सर्व नियमांचे पालन करावे.'


'केंद्र शासनाने देवस्थाने सुरु करण्याबाबत यापूर्वीच परिपत्रक जारी केले आहे. देशभरातील प्रमुख देवस्थाने सुरु देखील करण्यात आली आहेत. महाराष्ट्रातही देवस्थाने सुरु करण्याची अनेक व्यक्ती तसेच संघटनांनी राज्य सरकारकडे खूप वेळा मागणी केली आहे. सर्व नियम मान्य करुन देवस्थाने आणि भजन, पूजन, कीर्तन सुरु करावे ही सर्वांची एकमुखाने मागणी असतानाही, राज्यातील महाविकास आघाडी सरकार ती मान्य करत नाही.' अशी टीका देखील चंद्रकांत पाटील यांनी केली आहे.


'तीर्थक्षेत्र आणि प्रमुख देवस्थांनांच्या परिसरातील असंख्य लोकांची उपजीविका केवळ देवस्थानांवर अवलंबून आहे. त्याचाही राज्य सरकारने सहानुभूतीने विचार करण्याची गरज आहे.' असं देखीस त्यांनी यावेळी म्हटलं आहे.