2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा! भाजपाला 400 पेक्षा जास्त जागा - चंद्रकांत पाटील
विधानसभा निवडणुकीतही जनता महाविकास आघाडी सरकारला परत पाठवणार असल्याचा चंद्रकांत पाटील यांचा टोला
कोल्हापूर : राजनितीकार प्रशांत किशोर यांनी काल काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलं आहे. देशात लोकसभा निवडणुकीपूर्वी तिसरी आघाडी उभी करण्याच्या जोरदार हालचाली सुरू असल्याचं बोललं जात आहे. यावर बोलताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी टोला लगावला आहे.
'2024 मध्ये कुणाच्याही नेतृत्वात निवडणूक लढवा. भाजप 400 पेक्षा अधिक जागा जिंकेल', असा दावा चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. कोल्हापूरात पत्रकारांशी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर टीका केली.
इतकंच नाही तर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारलाही जनता परत पाठवणार असल्याचंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे. 'एकाने मारायचं दुसऱ्याने समजवायचं' असा खेळ राज्य सरकारमध्ये सुरू आहे, हा खेळ न कळण्याइतकी महाराष्ट्राची जनता मूर्ख नाही, त्याची शिक्षा त्यांना निवडणुकीत मिळेल, सरकारचं नाटक चालू आहे त्याला लोकं विटली आहेत, असा घणाघातही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी काल कार्यकर्त्यांशी संवाद साधला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. पंकजा मुंडे यांनी आपली भूमिका मांडली, त्यांनी अतिशय परिपक्व असल्याचं दाखवून दिलं. गोपीनाथ मुंडे यांनी महाराष्ट्रातील भाजपला संघर्ष करणारी संघटना म्हणून ओळख निर्माण करून दिली. अशा घरात जन्मलेल्या पंकजा मुंडे कधीच बंडाचा विचार करणार नाही, असं भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केलं.