मुंबई : मराठवाड्याच्या पाणी प्रश्नासाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या सोमवारी उपोषण करणार आहेत. कायम दुष्काळाशी सामना करत असलेल्या मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नासाठी भाजपच्यावतीने  पंकजा मुंडे या औरंगाबाद येथे २७ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता विभागीय आयुक्त कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करणार आहेत, अशी माहिती भाजप प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी गुरुवारी दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक बुधवारी मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात झाली. मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्याच्या प्रश्नाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी लाक्षणिक उपोषण करण्याचा निर्णय या बैठकीत झाला.


या उपोषणात देवेंद्र फडणवीस, रावसाहेब दानवे, विधानसभेचे माजी अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर सहभागी होणार आहेत, अशी माहिती ठाकूर यांनी दिली. त्यांनी सांगितले, देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात मराठवाड्याच्या दुष्काळमुक्तीसाठी विविध योजना हाती घेण्यात आल्या. मात्र राज्यात शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर त्या सरकारमधील नेत्यांचा बहुतेक वेळ एकमेकांवर कुरघोडी करण्यातच जात आहे.


जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांकडे महाराष्ट्र विकासआघाडी सरकारचे दुर्लक्ष होत आहे. फडणवीस सरकारच्या काळात मराठवाड्याच्या विकासाला गती मिळाली होती, पण आता मात्र या विभागाच्या विकासाचे काय होणार, हा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी हे उपोषण होणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.



मराठवाड्याच्या हितासाठी भाजपच्या काही मागण्या आहेत. यात मराठवाड्याला हक्काचे पाणी द्यावे, मराठवाडा विभागाचा सिंचनाचा अनुशेष दूर करण्यासाठी दरवर्षी एक हजार कोटी रुपये अतिरिक्त द्यावेत, जलयुक्त शिवार योजना पुढे चालू ठेवावी आणि प्रभावीपणे राबवावी, महत्त्वाकांक्षी मराठवाडा वॉटरग्रीड योजना तातडीने सुरू करून अकरा धरणे लूप पद्धतीने जोडावी आदींचा समावेश आहे.