भंडारा : केंद्र सरकारने बेरोजगारी, छोट्या व्यापाऱ्यांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न निर्माण करून ठेवले आहे. हे प्रश्न डायव्हर्ट करण्यासाठी सातत्याने भाजप एखाद्या इश्यूला घेऊन अर्थाचा अनर्थ करून महाराष्ट्र वातावरण खराब करत आहे. भाजपच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे ते हे असे कृत्य करत आहे अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मी मोदींना मारेन, शिव्या देईन या विधानावरून भाजपने नाना पटोले यांच्याविरोधात राज्यात आंदोलन छेडले आहे. भाजप खासदार सुनील मेंढे यांनी सोमवारी संध्याकाळी भंडारा पोलीस ठाण्यात पटोले यांच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेत पटोले यांची चौकशी केली. त्यांनतर ते नागपूर विमानतळावर पत्रकारांशी बोलत होते. 


प्रधानमंत्री पद हे देशाचे पद आहे. ते कुण्या एका पक्षाचे नसते. हे मी सातत्याने सांगत आहे. काँग्रेसने या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्यामुळे प्रधानमंत्री पद, त्याची  महिमा आणि गौरव हा काँग्रेसला जास्त माहित आहे. पण, ज्या पद्धतीने भाजप राज्यात कोरोनाचे सर्व नियम तोडून आंदोलन करत आहे. कोणतेही कारण नसताना मला अटक करण्याची मागणी करत आहे, ते चुकीचे आहे. 


पोलिसांच्या चौकशीमध्ये, तुम्हीच याचा तपास करा. ज्या मोदींबद्दल मी बोललो त्याच्याबद्दल लोकांची तक्रार आली नसेल. त्या पद्धतीचा गावगुंड त्या गावात नसेल तर माझ्यावर निश्चितपणे कारवाई करा. मी काही जाहीर सभेत बोललो नाही आणि पंतप्रधान मोदी यांच्याबद्दल तर मुळीच नाही, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


जे म्हणालोच नाही त्याचा अनर्थ करून, गहजब करून भाजपने महाराष्ट्राची बदनामी केली आहे. पण भाजपाला महाराष्ट्राची जनता जागा दाखवेल, असेही नाना पटोले म्हणाले. तसेच, प्रधानमंत्री पदाचा मान घालविणाऱ्या या आंदोलनाविरोधात काँग्रेसकडून तक्रार करण्यात येणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.