आमच्यासोबत असताना शिवसेनेला मराठा आरक्षणात रस नव्हता- दानवे
आरक्षणासंदर्भातील ठराव मांडला होता
मुंबई : भाजपसोबत सत्तेत असतेवेळी शिवसेनेनं Maratha Reservation मराठा आरक्षणात केव्हाच रस दाखवला नाही. किंबहुना ते अनेक वेळा बैठकीला आलेच नाही असा टोला भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी लगावला आहे. सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटत असतानाच आता त्यामध्ये दानवेंनीही शिवसेनेला धारेवर धरलं आहे.
शिवसेनेतील कोणी बैठकीला आलं तरीही त्यांनी केव्हाच भूमिकाही घेतली नाही. यावरुनच शिवसेनेला आरक्षणात रस नसल्याचं असं स्पष्ट मत दानवेंनी व्यक्त करत गंभीर आरोप केले.
भाजपकडून प्रदेश कार्यकारिणीत आरक्षणासंदर्भातील ठराव मांडला होता. किंबहुना भाजपमुळंच मागील सरकारमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळालं, असं म्हणत मराठा समाज आरक्षणाच्या मुद्द्यावर महाविकासआघाडी सरकार सपशेल अपयशी ठरलं आहे, असं म्हणत दानवे यांनी राज्यातील सरकारवर निशाणा साधला.
दरम्यान, मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राज्यात बऱ्याच घडामोडी घडत असून केंद्राच्या दरबारीसुद्धा याचे पडसाद उमटू लागल्याचं चिन्हं आहे. इथं नुकतीच राज्य सरकारने आज सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक नेते या बैठकीला उपस्थित होते. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकार तीन पर्यायांवर विचार करत असल्याची बाब या बैठकीनंतर समोर आली. अध्यादेश काढणे, फेरविचार याचिका दाखल करणे आणि खंडपीठाकडे जाणे हे ते तीन पर्याय. पहिले दोन पर्याय शासनाला योग्य वाटत नाही. तिसरा पर्याय योग्य वाटतोय, असं देवेंद्र फडणवीस या बैठकीनंतर म्हणाले होते.