भाजपचा नव्या बहुजन चेहऱ्यांना समोर आणण्याची रणनीती
भाजपची बहुजन समाजातील नव्या नेतृत्वाला संधी
मुंबई : एकनाथ खडसे, पंकजा मुंडे यांच्यासारख्या ओबीसी नेत्यांनी बंडाची भाषा सुरू केल्यानंतर त्यांच्यावर तडकाफडकी कारवाई करण्याऐवजी हळूहळू नव्या चेहऱ्यांना प्रोत्साहन देऊन बहुजन समाजातील नवं नेतृत्व राज्य पातळीवर तयार करायचं अशी रणनीती भाजपनं आखल्याची माहिती सूत्रांकडून मिळते आहे. राज्य पातळीवरील बहुजन नेतृत्व म्हणून पक्ष माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी मंत्री आणि आमदार डॉ. संजय कुटे, आमदार किसन कथोरे, आमदार मनीषा चौधरी, आमदार अतुल सावे, माजी मंत्री डॉ. अनिल बोंडे, खासदार रामदास तडस, आमदार आकाश फुंडकर, आमदार प्रताप अडसड, आमदार तुषार राठोड, आमदार नीलय नाईक यांचा समावेश असल्याचं कळतं आहे.
कुणबी, माळी, तेली, बंजारा समाजासह वंजारी, लेवा पाटील समाज घटकांना पुढे आणण्याची रणनीती आहे. या सर्व नेत्यांना राजकीय वलय नसलं तरी त्यांना पक्षात महत्त्व देऊन राज्य पातळीवर पुढे आणता येईल असा विचार प्रामुख्यानं केला जातो आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी गोपीनाथ गडावर भाजप आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव घेऊन टीका केली होती. पक्षात आता जे सुरु आहे ते जनतेला मान्य नाही. असं देखील त्यांनी म्हटलं आहे. पक्षातील लोकांनीच आम्हाला पाडल्याचं पाप केलं आहे अशी टीका ही त्यांनी यावेळी केली होती. इतका अपमान होत असून ही पक्षात का थांबायचं. त्यामुळे मी पक्षात राहिल असं समजू नका असं देखील त्यांनी म्हटलं होतं. एकनाथ खडसे हे आता महाआघाडीच्या संपर्कात असल्याचं कळतं आहे. हिवाळी अधिवेशनात भाजपमध्ये मोठा भूकंप होईल असं काँग्रेसचे नेते आणि मंत्री नितीन राऊत यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची ओळख ही देखील बहुजनांचे नेते अशीच होती. पंकजा मुंडे या आता त्यांचा वारसा पुढे नेत आहेत. पण पंकजा मुंडे या नाराज असल्याचं कळतं आहे. सध्या त्यांची समजूत काढण्याच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना यश आलं असलं तरी देखील भविष्यात पंकजा मुंडे या पुन्हा बंड करतील अशी भीती भाजपच्या मनात असेल. त्यामुळे भाजपमधील बहुजन नेत्यांना आता पुढे आणण्याची रणनीती सुरु असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे.