बाहुल्या, खिळे, लिंबू... कौटुंबिक छळानं दाखवले काळ्या जादूचे प्रयोग!
अगदी उच्चशिक्षित मंडळीही जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवत असतील तर सामान्य माणसांचं काय?
जितेंद्र शिंगाडे, झी मीडिया, नागपूर : तिला आपल्या पतीसह सासरच्या मंडळींचा कायमचा काटा काढायचा होता... त्यासाठी तिनं चक्क आधार घेतला तो काळ्या जादूचा... पती आणि पत्नीमधील वाद कोणत्या टोकाला जाऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार नागपुरात उघडकीस आला. पीठाच्या बाहुल्या... बाहुल्यांवर कुटुंबीयांची नावं... खिळे टोचलेले लिंबू... आणि लाल कुंकवानं लिहिलेला 'मृत्यू'... असा सगळा काळ्या जादूचा प्रकार नागपूरच्या झिंगाबाई टाकळी परिसरात राहणाऱ्या कनोजिया कुटुंबाच्या घरासमोरचं गेल्या कित्येक दिवसांपासून आढळून येत होता. गेल्या १६ मे पासून सचिन कनोजिया यांच्या अंगणात हे असे अघोरी प्रकार सुरू होते. त्यामुळं कनोजिया कुटुंबीय प्रचंड मानसिक तणावात होतं.
हे अघोरी प्रकार नेमकं कोण करतंय? याची शहानिशा करण्यासाठी कनोजियांनी घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवले. तेव्हा पाठीवर बॅग लटकवलेली एक व्यक्ती घराच्या दिशेनं काहीतरी फेकत असल्याचं सीसीटीव्ही चित्रणात आढळलं. ही व्यक्ती नेमकी कोण? हे शोधण्यासाठी कनोजियांनी मग पाळत ठेवली. गेल्या १ जूनला ती व्यक्ती पुन्हा घरासमोर फिरताना आढळली तेव्हा सचिनच्या भावानं त्याला पकडलं.
दिलीप जैस्वाल असं त्या व्यक्तीचं नाव असून तो स्वतःला पत्रकार म्हणवत होता. त्याच्या बॅगची तपासणी केली असता त्यात चक्क बुवाबाजीचं साहित्य आढळले. त्याचा मोबाईल तपासल्यावर कनोजिया कुटुंबीयांना आणखी मोठा धक्का बसला. कारण, त्याच्या मोबाईलच्या व्हाट्स ऍपवर सचिनची पत्नी किरण आणि दिलीप यांच्यातील चॅटिंगचे धक्कादायक पुरावे आढळले.
रेल्वेत लिपिक म्हणून कार्य करणाऱ्या सचिन कनोजीयाचा २०१३ साली किरण जैस्वालसोबत विवाह झाला. विवाहानंतर १६ महिन्यातच दोघांत खटके उडू लागले. पत्नी किरणनं कनोजियांविरोधात कौटुंबिक छळाचा गुन्हा दाखल केला. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे.
दरम्यानच्या काळात किरणची ओळख दिलीप जैस्वाल नावाच्या मांत्रिकाशी झाली. किरण आणि मांत्रिकानं काळ्या जादूनं कनोजिया कुटुंबातील सदस्यांना ठार मारण्याचा कट आखला. त्यातूनच कनोजिया यांच्या घरी कधी बाहुल्या, तर कधी हळदी -कुंकवाचे खिळे टोचलेले लिंबू फेकण्याचे प्रकार सुरु झाले. याप्रकरणी पोलिसांनी आता दोघांनाही अटक केलीय.
सूडानं पेटलेली महिला कोणत्या थराला जाऊ शकते, याचं हे उदाहरण... अगदी उच्चशिक्षित मंडळीही जादूटोण्यासारख्या अघोरी प्रकारांवर विश्वास ठेवत असतील तर सामान्य माणसांचं काय? असा सवालही यानिमित्तानं उपस्थित होतोय.