पालघर : नेहमी चर्चेत असलेल्या पालघर (Palghar) जिल्ह्यात पुन्हा एकदा जादूटोणा (Black Magic) प्रकरण समोर आले आहे. शिवसेनेचे नेते आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्यावर जादूटोणा (Black) केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. शिंदे यांच्या नावाने जादूटोणा करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. शिंदे यांचा फोटो लावून अपाय करण्याच्या हेतून पूजा सुरु होती. हा सगळा धक्कादायक प्रकार पालघर जिल्ह्यातील घडल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

राज्यातील अघोरी जादूटोणा नरबळींचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन शासनाने महाराष्ट्र नरबळी आणि अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि समूळ उच्चाटन करण्यासाठी अधिनियम २०१३ अंमलात आणला. मात्र अजूनही अघोरी जादूटोणा या सारखे प्रकार सुरु असल्याचे पुढे आले आहे. या प्रकरणात दुसरे तिसरे कोणी नाही तर खुद्द राज्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव आल्याने सर्वत्र एकच, खळबळ उडाली आहे. विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथील एका घरात तांदळामध्ये मंत्री एकनाथ शिंदे यांचा फोटो ठेवून अलौकिक शक्तीची कृपा मिळविण्याच्या हेतूने शिंदे यांच्या जीवाला धोका व्हावा, या हेतून अघोरी प्रथांचा वापर करण्यात आला. 


ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धोका होण्यासाठी याच अघोरी प्रथेचा वापर करण्यात आल्याचे समोर आले आहे. हळद, कुंकू, काळा बुक्का, लिंबू, सफेद कोंबडा यांचा वापर करून जादूटोणा करणारे दोघांना स्थानिक गुन्हा शाखेने अटक केली आहे. आरोपी जादूटोणा करून लोकांना फसवून पैसे उकळत असल्याचे सांगितले जात आहे. अशा अघोरी घटना होतात त्यावर विश्वास ठेवायची गरज नाही, असे शिंदे यांनी म्हटले आहे.


जादूटोणा करणाऱ्यांना पालघर उपविभागीय पोलीस अधिकारी विकास नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली बोईसर स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने विक्रमगड तालुक्यातील आणि जव्हार पोलीस स्टेशन हद्दीतील कऱ्हे तलावली येथून दोघांना अटक केली आहे. कृष्णा बाळू कुरकुटे, संतोष मगरू वारडी यांच्यावर जव्हार पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक आणि महाराष्ट्र नरबळी, अमानुष अनिष्ठ अघोरी प्रथा, जादूटोणा प्रतिबंध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.