निवडणुकीआधी अंधश्रद्धेचा बाजार, तिकीट कापण्यासाठी काळी जादू
धक्कादायक बातमी कोल्हापुरातून.
प्रताप नाईक, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीत तिकीट कापण्यासाठी चक्क काळी जादू केली जातेय. काही इच्छुक उमेदवारांना तिकीट मिळू नये म्हणून त्यांची नावं कागदावर लिहीण्यात आली. पुढे काय घडलं. कसा मांडला जातोय कोल्हापुरात अंधश्रद्धेचा बाजार.
कोल्हापुरात खळबळ उडवणारा एक फोटो व्हायरल होत आहे. कागदाला लिंबू, अंगारा, कुंकू, लोखंड टोचण्यात आलं आहे. कोल्हापुरात महापालिका निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू झालीय. त्यासाठी इच्छुक उमेदवारांची नावं एका कागदावर लिहीण्यात आली आणि त्याला लिंबू, अंगारा, काळा दोरा आणि लोखंड टोचण्यात आलं. रस्त्यावर हा कागद मिळाला. या इच्छुकांच्या विरोधात असलेल्यांनी हे काळं कृत्य केलं आहे.
निवडणूक जवळ आली की लॉबिंग, प्रचार, इच्छुकांची गर्दी, एकमेकांविरोधात काड्या करणं हे येतंच. पण विरोधकांचं तिकीट कापण्यासाठी खच्ची करण्यासाठी काळी जादू वापरली जात असेल तर हे फारच भयानक आहे.
कोल्हापूर शहरामधला आठवड्यातला हा दुसरा प्रकार आहे. काही दिवसांपूर्वी कळंबा स्मशानभूमीमध्ये काही मुलांची नावं लिंबावर लिहून त्याला टाचण्या टोचण्यात आल्या होत्या. छत्रपती शाहू महाराजांच्या पुरोगामी कोल्हापूरला लाज आणणारा हा प्रकार आहे.
यापूर्वी ग्रामपंचायत निवडणूक ते थेट लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने अनेक वेळा करणी आणि भानामतीचे प्रकार कोल्हापूर जिल्ह्यात पहायला मिळाले आहेत. कोल्हापूर महानगरपालिका पालिका निवडणुकीच्या निमित्ताने देखील अनेक असे प्रकार अनेक वेळा निदर्शनास आले आहेत. त्यामुळे अशा कृत्यांना खतपाणी घालणाऱ्या लोकांना निवडणुकीत अद्दल घडविण्याची गरज आहे. तरच असे प्रकार रोखण्यात यश येईल.