पराभवावरुन महाविकास आघाडीत ब्लेम गेम,ठाकरेंच्या पक्षाचा काँग्रेस, पवारांच्या राष्ट्रवादीवर निशाणा
Mahavikas Aghadi Blame Game: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवाचं घटकपक्ष आपापल्या परीनं विश्लेषण करु लागलेत.
Mahavikas Aghadi Blame Game: विधानसभा निडवणुकीत महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. त्यानंतर आता मविआच्या नेत्यांमध्ये पराभवाच्या कारणावरुन आरोप प्रत्यारोप सुरु झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आता आक्रमक झाले असून, त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधलाय. त्यामुळे काँग्रेसकडून आता काय उत्तर दिलं जाणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या झालेल्या पराभवाचं घटकपक्ष आपापल्या परीनं विश्लेषण करु लागलेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं झालेल्या पराभवाचं खापर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षावर फोडलंय. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदाचे उमेदवार जाहीर केलं असतं तर मतांची टक्केवारी वाढली असती असा दावा अंबादास दानवेंनी केलाय. काँग्रेस नेत्यांचा अतिआत्मविश्वास नडल्याचा आरोपही अंबादास दानवेंनी केलाय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या अंबादास दानवेंनी केलेल्या आरोपांचा काँग्रेसनं समाचार घेतलाय. काँग्रेसनं अंबादास दानवेंच्या हेतूवरच संशय घेतलाय.पराभवाचं विश्लेषण करुन झालेल्या चुका सुधारणं अपेक्षित असतं. महाविकास आघाडीत पराभवाचं विश्लेषण हे एकमेकांवर खापर फोडण्यासाठी केलं जात असल्याचं या ब्लेम गेमवरुन अधोरेखित होऊ लागलंय.
स्वबळावर लढण्यासंबंधी विचारण्यात आलं असता अंबादास दानवे म्हणाले की, "मी काल ताकद निर्माण केली पाहिजे अशी भूमिका मांडली. स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी कामला लागलं पाहिजे असं मी म्हटलं होतं. महाविकास आघाडीतून बाहेर पडलं पाहिजे असं मी म्हणालेलो नाही". पुढे ते म्हणाले, "महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही 33 जागा निवडून आलो. तेव्हाही तेच मतदार होते आणि आताही तेच मतदार आहेत. उद्धव ठाकरे यांचं नाव मुख्यमंत्रिपदासाठी पुढे गेलं असतं तर चार-पाच टक्के मतदान वाढलं असतं आणि सर्वांना फायदा झाला असता". "काँग्रेसचे लोक तर कोणतं मंत्रिपद, खातं मिळणार याच्यावर चर्चा करत होते हे सत्य आहे. मुख्यमंत्रिपदासाठी तर 10 जण इच्छुक होते. उद्धव ठाकरेंचं नाव जाहीर झालं असतं तर मतं वाढली असती. काँग्रेसला जर त्यांचा मुख्यमंत्री हवा होता तर त्यांनी नाव जाहीर करायला हवं होतं. उद्धव ठाकरेंनी तुम्ही नाव जाहीर करा, मी पाठिंबा देतो म्हटलं होतं. पण तसंही झालं नाही," असं अंबादास दानवे म्हणाले. ठाकरे बंधू एकत्र येणार का? असं विचारलं असता त्यांनी आमच्याकडे तशी चर्चा नाही असं स्पष्ट केलं. मनसे कोणाच्या बाजूने आणि विरोधात होते त्यांनी स्पष्ट करावं असंही त्यांनी सांगितलं आहे. तसंच फडणवीस मुख्यमंत्री व्हावे हे सुस्पष्ट नसल्याने वैचारिक गोंधळ निर्माण झाला आहे असा टोला लगावला.
'...तर पाडापाडीच राजकारण झालं नसतं'
मुख्यमंत्री पदाचा चेहरा जाहीर करणं गरजेचं होतं. तर पाडापाडीच राजकारण झालं नसतं.कांग्रेस, राष्ट्रवादीने अपक्ष आमदार केले होते, असे सुषमा अंधारे यांनी सांगितले. सर्व सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील मुख्यमंत्री पदाचा चेहरा उद्धव ठाकरे हेच होते, असे सुषमा अंधारे म्हणाल्या. 'माझ्या पक्षाच्या लढलेल्या उमेदवारांचा अभिमान आहे. दिल्लीतून पैशांचा धो धो पाऊस पडत होता. एका मतासाठी साडेतीन हजारचा दर आम्ही ऐकला. तरी उमेदवार ताकदीनं लढत होते.आम्ही सामान्यातल्या सामान्य चेहऱ्याला असामान्य करतो. हा शिवसेनेचा यूएसपी आहे. महेश सावंत यांच्या निकालाने हे दाखवून दिल्याचे सुषमा अंधारे म्हणाल्या.