कैलास पुरी, झी मिडिया, पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडचे पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांची आयर्न मॅन अशी ओळख आहे. त्यांच्या या इमेजला साजेसा पुरस्कार त्यांना नुकताच मिळाला. आयर्न मॅन किताब पटकविल्यानंतर आयुक्त कृष्ण प्रकाश यांच्या नावाचा वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्ड, लंडन मध्ये समावेश करण्यात आला. आयपीएस - आयएएस, संरक्षण दल, आर्म फोर्स, सनदी, पॅरामिलिटरी मधील वर्ल्ड बूक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद होणारे आयुक्त कृष्ण प्रकाश हे देशातील पहिलेच अधिकारी ठरले आहेत. साहजिकच त्यांच्यावर कौतुकाचा वर्षांव झाला. तो होणे अपेक्षित ही होते. कृष्ण प्रकाश यांनी सूत्र हातात घेतल्या नंतर शहरातील मटका, बनावट दारू विक्रीवर जोरदार प्रहार करत त्यावर आळा घातला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING


अर्थात त्यासाठी ही त्यांचे अभिनंदन. परंतू एकीकडे कृष्ण प्रकाश यांचे काम कौतुकास्पद वाटत असले तरी ज्या पद्धतीने ते आयुक्तपद हाताळत आहेत ते पाहता ते स्वप्रतिमेच्या प्रचंड प्रेमात असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे. खरे तर "सिंघम" प्रतिमा सर्वच पोलिसांना हवी आहे. परंतू याचा अर्थ आपण किती आणि कशा पद्धतीने प्रसिद्धी मिळवावी याचा ही विचार करणे आवश्यक आहे. 



सध्या पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तांचे कधी फॅशन शो मध्ये चालताना, कधी फ़ुटबाँल खेळताना तर कधी आणखी काही करतानाचे फोटो सातत्याने प्रसिद्ध होत आहेत. कधी ते रस्त्यावर वाहन चालकांना फुले वाटताना दिसले तर कधी सायकल चालवताना. 


अर्थात पोलिसांच्या आरोग्यासाठी असे उपक्रम राबवणे योग्य ही आहे. परंतू हे कार्यक्रम आखताना त्याचा प्रसिद्धीपेक्षा मुख्य हेतूवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. कारण सायकल रॅली नंतर किती पोलिसांनी आरोग्याचा मुद्दा गांभीर्याने घेतलाय हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. 



हे कमी की काय म्हणून आयुक्तांच्या दालनात अजून ही दररोज फुलांचे गुच्छ घेऊन अनेकजण फोटो सेशन करून घेतात. एकीकडे आयुक्तांचे असे दररोज फोटो येत असताना आयुक्तालयात होणाऱ्या पत्रकार परिषदांचे स्वरूप ही सबकुछ आयुक्त असेच आहे. 


अगदी ड्रग्स पकडल्यापासून काही तोळे सोने पकडल्याच्या प्रेस कॉन्फरन्स ही आयुक्त घेतात. अर्थात ज्यांनी कामगिरी केले ते प्रेसला असतात. परंतू पोलिस आयुक्तांनी काही तोळे सोने किंवा दुचाकी चोरांची टोळी पकडल्याची प्रेस कॉन्फरन्स घ्यावी का ? हा खरा प्रश्न आहे. 


पोलीस आयुक्त शहराच्या पोलीस दलाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी एखाद्या मोठ्या कामगिरीचे ब्रिफींग करणे आवश्यकच आहे. परंतू सर्वच प्रेस कॉन्फरन्स आयुक्त घेत असतील तर त्याचे गांभीर्य कमी होण्याची भीती नाकारता येत नाही. 


पोलीस आयुक्त आल्यापासून शहरातील कायदा सुव्यवस्था नक्कीच सुधारली आहे. परंतू तरीही नववर्षाचे स्वागत गाड्या तोडफोडीने झाले. हे सत्र खरे तर म्हणावे तसे थांबलेले नाही. 


जमीन व्यवहार फसवणूक, बिल्डर फसवणूक अश्या मोठया विषयात अजून ही फसवणूक सुरूच आहे. त्यामुळे आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी मुख्य समस्यांवर लक्ष द्यावे अन्यथा या "कृष्ण" चा प्रकाश स्वतः वरच असे म्हणण्याची वेळ आल्याशिवाय राहणार नाही.